हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या शहरात होणाऱ्या फेऱ्यांबाबत यंदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारपासून (ता. १५) होणाऱ्या नाट्यस्पर्धेचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे शहरातील रसिकांना वेगवेगळ्या नाटकांचा आनंद लुटता येणार आहे. 

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा म्हणजे हौशी रंगकर्मींसाठी अभिनयाची पर्वणीच असते. स्पर्धेच्या काही फेऱ्या गेल्या काही वर्षांपासून शहरातील प्रा. मोरे प्रेक्षागृहात होत आहेत. मात्र यंदा प्रेक्षागृहासह संत तुकारामनगरमधील आचार्य रंग मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. सांगवीतील नटसम्राट निळुभाऊ फुले व भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहांच्या तारखा बुक झालेल्या आहेत. त्यात ५८ वी हौशी नाट्यस्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने प्रा. मोरे प्रेक्षागृह मिळणे मुश्‍कील होते. परंतु महापालिकेने चार नोव्हेंबरला ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाद्वारे प्रेक्षागृह खुले केल्याने नाट्यस्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गुरुवारी औपचारिक उद्‌घाटन
हौशी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील २४ केंद्रांवर होत आहे. त्यातील पिंपरी- चिंचवड केंद्रावरील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता. १५) सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी असतील. पिंपरी-चिंचवड केंद्र समन्वयकपदी सायली कोल्हटकर आणि सहसमन्वयकपदी राजेंद्र बंग यांची निवड झाली आहे.

हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, तीन डिसेंबरला समारोप होईल. दररोज एक नाटक असेल. स्पर्धेतील नाटकांचा रंगकर्मी, रसिक व कलाप्रेमींनी आस्वाद घ्यावा.
- स्वाती काळे, संचालिका, सांस्कृतिक कार्य संचालनालय, राज्य सरकार

Web Title: Marathi Drama Competition