संहितेला पूरक अभिनय

सुहास जोशी
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अथर्व थिएटर्स, पुणे यांनी डॉ. शंतनू अभ्यंकर लिखित ‘रात्र १६ जानेवारीची’ हे नाटक सादर केले. मूळ इंग्रजी नाटक आयन रॅंड यांनी लिहिले आहे. केतन पटेल हा एका नामांकित उद्योगपती. त्याची खासगी सचिव बकुळ राणे हीच त्याची प्रेयसी असते.

अथर्व थिएटर्स, पुणे यांनी डॉ. शंतनू अभ्यंकर लिखित ‘रात्र १६ जानेवारीची’ हे नाटक सादर केले. मूळ इंग्रजी नाटक आयन रॅंड यांनी लिहिले आहे. केतन पटेल हा एका नामांकित उद्योगपती. त्याची खासगी सचिव बकुळ राणे हीच त्याची प्रेयसी असते.

कालांतराने सावजीभाई शहा या उद्योगपतीची मुलगी कोमल पटेल हिच्याशी त्याचे लग्न होते. त्या वेळी सावजीभाईंनी केतनच्या डबघाईच्या काळात २५ कोटींचे कर्ज दिलेले असते. त्याबदल्यात आपल्या मुलीचे लग्न लावल्याचा उल्लेख पुढे साक्षीदरम्यान येतो आणि सुरू होते एक असूया. बकुळ राणे आणि कोमल यांचा संघर्ष. त्यातच बकुळचा गुंड प्रवृत्तीचा गंगा रांदड हा प्रियकर असणे, त्यातच केतन पटेलचा एकविसाव्या मजल्यावरून मृत्यू होतो. मग सुरू होते चढाओढ हा खून आहे की आत्महत्या हे सिद्ध करण्याची. न्यायालयात वकिलांचे दावे, प्रतिदावे त्या अनुषंगाने येणारे दोन्ही बाजूंचे साक्षीदार, प्रेक्षकांत बसविण्यात आलेले व त्यांना पढवून ठेवलेले ज्युरी आणि त्यांनी बकुळवरचे आरोप बहुमताने फेटाळणे अशी ही कथा. पूर्वी सुलभा देशपांडे यांनी गाजविलेल्या शांतता कोर्ट चालू आहे, यानंतरचा हा दुसराच कोर्ट ड्रामा असलेले नाटक.

यात काम करणारे बरेचसे कलाकार डॉक्‍टर व वकील असण्यामुळे दिग्दर्शक डॉ. निर्मल ढुमणे यांनी सुनिहित आणि सयुक्तिक असा प्रयोग बसविला होता. जवळ जवळ २० ते २२ कलाकार प्रत्यक्ष रंगमंचावर असूनही संयमित आणि सुसह्य असा प्रयोग होता. त्यातल्या त्यात दोन्ही वकील, साक्षीदार लीला वॉलेस, बकुळ राणे आणि सावजीभाई तसेच पोलिस निरीक्षक भाव खाऊन गेले तरीही इतर कलाकारांचा अभिनय संहितेला पूरक असा होता. नेपथ्यात न्यायालयाचा देखावा व्यवस्थित उभा केला होता. न्यायमूर्तींनी ज्युरींना सूचना देण्याच्या अगोदरच कारकूनाने ज्युरीच्या निकालाच्या चिठ्या गोळा करून रंगमंचावर जाणे खटकत होते. याचा अर्थ ज्यूरींना अगोदरच चिठ्या देऊन प्रेक्षकांत बसविणे हे काहीसे खटकत होते.

तीच गोष्ट पेपरवाल्याची प्रेक्षागृहात येऊन पेपर विकणे आणि ज्यूरीमधील ठरविलेल्या दोघांनीच पेपर घेणे. काही प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे पेपर विकत मागणे; पण पेपरवाला त्याला प्रतिसाद न देता निघून जातो. पण पेपरवाल्याला प्रेक्षकांत पाठविण्याचा अट्टहास का? रंगभूषा वेषभूषा ही त्या त्या पात्राला अनुरूप होती. फक्‍त सावजीभाईंच्या टोपीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. कारण ती डोक्‍यापेक्षा मोठी वाटत होती. प्रकाश योजना चांगली होती. पार्श्‍वसंगीत बऱ्यापैकी होते. फक्‍त बातम्यांच्या वेळी वाजणारी जिंगल (संगीत) हे दूरदर्शन सुरू होतानाचे होते. त्याकाळी दूरदर्शन हे २४ तास चालणारे नव्हते. त्याची सुरुवात होताना याच जिंगलने व्हायची, असो. या काही किरकोळ त्रुटी नाटकाचे महत्त्व कमी करत होत्या. एक चांगला व सुसंगत प्रयोग बघण्याचे समाधान मिळाले.

नाटकाचे नाव - रात्र १६ जानेवारीची   मूळ लेखिका : आयन रॅंड   मराठी रूपांतर : डॉ. शंतनू अभ्यंकर   दिग्दर्शन : डॉ. निर्मल ढुमणे  संगीत : तेजस चव्हाण   संगीत संयोजन : राजस चव्हाण   नेपथ्य : मिलिंद बावा प्रकाश योजना : आनंद पायरे, स्वानंद केतकर   वेशभूषा : अभीश्री कुलकर्णी   रंगभूषा : कमलेश खिचे   पात्रपरिचय - बकुळ राणे - ॲड. अभिश्री कुलकर्णी   जज मेहरू इराणी - प्रियांका आचार्य   बेलिफ - परेश कुंभार   कारकून - श्रवण संकपाळ   ॲड. विनायकराव पाटील - डॉ. सुचेत गवई   ॲड. जीवन मथाई - ॲड. योगी कुलकर्णी   डॉ. सुभाष कुर्लेकर आणि जगन्नाथ चांदेकर - डॉ. पुष्कर खैर   शंकरसिंह डोग्रा - श्रेयस बेहरे   नारायणमूर्ती स्वामिनाथन आणि गंगा रांदड - निर्मल ढुमणे,   इन्स्पेक्‍टर अनंत चौधरी - मिलिंद बावा   कोमल पटेल - डॉ. अश्‍विनी खैर   सावजीभाई शहा - प्रदीप मुजुमदार   श्रीराम पंडित - एकनाथ पडवळ   लीला वॉलेस - सुमेधा सहस्रबुद्धे  पेपरवाला - राजस चव्हाण   पत्रवाला - येरमुने   कोर्टातील प्रेक्षक - सौरभ साळुंखे, विश्‍वजित चाळक, प्रसाद भागवत, मनोज येरमुने, मानसी कुलकर्णी, नीतू ढुमणे, सचिन फुलसुंदर, नामदेव पडदणे, हृषीकेश फाकटकर, स्वाती बावा, स्वाती पारोळे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi drama competition