#मायमराठी मराठी मूल्यमापनाचा ‘गृहपाठ’ कच्चा

#मायमराठी  मराठी मूल्यमापनाचा ‘गृहपाठ’ कच्चा

पुणे - अमराठी शाळांमध्ये मराठीसक्तीचा कायदा करावा, ही मागणी जोर धरत असताना महापालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी कसे आहे? याचे मूल्यमापन करणारी यंत्रणाच नाही. केवळ वार्षिक परीक्षेतील मराठी विषयातील गुण दाखवून विद्यार्थ्यांचे मराठी दर्जेदार असल्याचा शिक्का शाळा व्यवस्थापन मारत आहे. त्यामुळे मराठी विषयाचे मूल्यमापन करण्याचा ‘गृहपाठ’ महापालिकेचा शिक्षण विभाग करीत नसल्याचे समोर आले आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मराठी विषय सक्तीचा करावा, ही मागणी करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर मराठी विषयामध्ये विद्यार्थ्यांचा पाया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याप्रकारे यंत्रणा उभी करून सरासरी गुण काढण्याची सवड संबंधित विभागाला मिळालेली नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या बालवाडी ते सातवीपर्यंतच्या एकूण २८७ शाळा आहेत. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कानडी शाळांचा समावेश आहे. त्यामध्ये सुमारे ८६ हजार एवढी पटसंख्या आहे. एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक इयत्तेनुसार ठरावीक विषयामध्ये सरासरी गुण किती आहेत? त्या विषयामध्ये त्याची प्रगती होत आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला प्रगती करण्यासाठी प्रयत्न करायचे असल्यास मुळात सरासरी गुण माहिती असणे आवश्‍यक आहे. त्यासोबतच अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करताना महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्याची किती प्रगती आहे, हे माहिती होणे अवघड झाले आहे. त्यामुळे तशी यंत्रणा उभी करून विषयानुसार गुणांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.

महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवे प्रयोग केले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचे मूल्यमापन होते. त्याची जबाबदारी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे आहे.
- मीनाक्षी राऊत, शिक्षण विभागप्रमुख, महापालिका
 


पटसंख्या घटतेय
खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु, त्याचा निकाल शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर आणि उपनगरांमधील महापालिकेच्या काही शाळांमधील पटसंख्या पुरेशी असली, तरी या वर्षी १० ते १२ वर्ग विलीन करण्याच्या हालचाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पटसंख्या पाच हजारांनी घटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com