'ABCD' सोबत या शाळांत 'गमभन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अभ्यासक्रम ठरविणार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले, की मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्याला अधिक व्यापक रूप देण्यात येईल. पालकांच्या आग्रहामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची मराठी भाषेशी नाळ जोडली जावी, यासाठी हा प्रयत्न करतो आहोत. लवकरच भाषातज्ज्ञांशी बोलून अभ्यासक्रम ठरविण्यात येईल. त्यानंतर संस्थाचालकांची एक बैठक साहित्य परिषदेत घेऊन या उपक्रमाला अधिक व्यापक रूप देण्यात येईल.

पुणे - इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची हे सरकारी धोरण टांगणीवर असतानाच या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शिकता यावे, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतल्या जातात, तशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी मराठी विषयाच्या परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण व्हावी, तसेच मराठी भाषा आणि वाङ्‌मय यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे, मराठी भाषेचा विकास आणि प्रसार व्हावा या उद्देशाने परिषदेमार्फत गेल्या ८० वर्षांपासून प्रथमा, प्रवेश, साहित्य प्राज्ञ आणि साहित्य विशारद या परीक्षा घेतल्या जातात. सहावी ते बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षांसाठी पात्र असतात. दरवर्षी अनेक विद्यार्थी या परीक्षा देतात. आता याच धर्तीवर इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

परीक्षेपूर्वी एक आणि दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतले जातात. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात परीक्षा घेतल्या जातात. याच धर्तीवर इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम चालविले जाणार आहेत. त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला जाणार असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना विश्‍वासात घेऊन तेथे हे अभ्यासक्रम चालविले जाणार आहेत. अभ्यासक्रमाचे स्वरूप वेगळे असले, तरी परीक्षा पद्धती समान असेल. इंग्रजी माध्यमांसाठी खास वेगळा अभ्यासक्रम लवकरच तयार केला जाणार आहे.

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi exam in english school