'तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी भाषेला पुढे न्यावे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

डॉ. गाडगीळ म्हणाले, "मनुष्य जसजसा बदलत गेला, त्याप्रमाणे त्याने शस्त्र, अलंकाराचे साठे निर्माण करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांच्यात जोरदार स्पर्धा होऊ लागली. त्यातून माणसाच्या आयुष्यात असंख्य बदल होत गेले. बदलत्या काळाने स्वयंचलित तंत्रज्ञानाने माणसाला बेरोजगार व निरुपयोगी केले. माणूस आता हळूहळू तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ लागला आहे.''

पुणे : "विकीपीडिया हे मानवी उत्क्रांतीचे दहावे संक्रमण असून, ते बुद्धिजीवी वर्गासाठीच नाही; तर सर्वसामान्यांसाठी देखील आहे. उत्क्रांतीच्या या नव्या टप्प्यावर आपणही त्याबरोबर पाऊल टाकण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी भाषेला पुढे नेले पाहिजे,'' असे मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेत "मानवी उत्क्रांतीची गाथा' या विषयावर ते बोलत होते. मानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे, स्वभाव, परिस्थितीनुरूप होत गेलेले बदल आणि प्रयोगशीलता यांसारख्या बदलांचा आढावा घेत त्यांनी मानवी उत्क्रांतीचा प्रवास या वेळी उलगडला.
डॉ. गाडगीळ म्हणाले, "मनुष्य जसजसा बदलत गेला, त्याप्रमाणे त्याने शस्त्र, अलंकाराचे साठे निर्माण करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांच्यात जोरदार स्पर्धा होऊ लागली. त्यातून माणसाच्या आयुष्यात असंख्य बदल होत गेले. बदलत्या काळाने स्वयंचलित तंत्रज्ञानाने माणसाला बेरोजगार व निरुपयोगी केले. माणूस आता हळूहळू तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ लागला आहे.''

अद्ययावत तंत्रज्ञान व इंटरनेटविषयी गाडगीळ म्हणाले, ""लिनक्‍स या कार्यप्रणालीमध्ये सहकारामधून उभी राहिलेली माहिती सर्वांसाठी खुली होऊन ती मोफत मिळू लागली. त्याद्वारे सर्वांसाठी उपयुक्त संगणक प्रणालीही उपलब्ध होऊ लागली. पुढे विकीपीडियासारखा ज्ञानकोष मिळाला. या चळवळीने कोणत्याही प्रकारचे ज्ञान, सर्व लोकांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करून दिले. 22 भारतीय भाषांमध्ये विकीपीडिया असून, दक्षिण भारतीय भाषा मराठीच्या खूप पुढे आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे मराठी भाषेला पुढे घेऊन गेले पाहिजे.''

Web Title: marathi language will grow with technology