नाट्य संमेलनावर यंदा पुण्याची छाप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - मुलुंड येथे भरणारे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. संमेलनात सहभागी होणारे निम्म्याहून अधिक कलाकार पुण्याचे आहेत. त्यामुळे संमेलनावर पुण्याचीच छाप पडणार आहे. साठ तास चालणाऱ्या या संमेलनात रंगभूमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी यांच्याविषयीची माहिती छोट्या चित्रफितीतून उलगडणार आहे. 

पुणे - मुलुंड येथे भरणारे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. संमेलनात सहभागी होणारे निम्म्याहून अधिक कलाकार पुण्याचे आहेत. त्यामुळे संमेलनावर पुण्याचीच छाप पडणार आहे. साठ तास चालणाऱ्या या संमेलनात रंगभूमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी यांच्याविषयीची माहिती छोट्या चित्रफितीतून उलगडणार आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात १३ ते १५ जूनदरम्यान हे संमेलन होणार आहे. १९६० पर्यंतचा संगीत रंगभूमीचा इतिहास, १९५५ ते २०१५ या कालावधीतला राज्य नाट्य स्पर्धेचा इतिहास, रंगभूमीवरील विविध प्रयोग, संहिता आणि सशक्त सादरीकरण यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. 

विजया मेहता, कमलाकर नाडकर्णी, कमलाकर सोनटक्के यांच्यासारख्या २४ दिग्गज रंगकर्मींनी घेतलेला रंगभूमीचा आढावा, रंगभूमीला योगदान देणारे मो. ग. रांगणेकर, मा. दत्ताराम, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, मामा पेंडसे, रामदास कामत, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, राम मराठे, अरविंद पिळगावकर, रामकृष्ण नाईक, कीर्ती शिलेदार, बाबा पार्सेकर यांची कारकीर्द या चित्रफितीतून दाखविण्यात येईल. शाहीर साबळे, रघुवीर खेडेकर, प्रभा शिवनेरकर, सत्यपाल महाराज, मीरा उमप, हिरामण बेडे, दत्तोबा भडाळे, ठका कृष्णा या लोकलावंतांचे कार्यही चित्रफितीतून रसिकांसमोर येईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी या चित्रफिती तयार केल्या आहेत.

भरगच्च कार्यक्रम  
नाट्यदिंडीमध्ये चारशे लोककलावंत सहभागी होतील. संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठेबापूराव, रंगबाजी, बालनाट्य, एकांकिका, नृत्यनाटिका, परिसंवाद, संगीतबारी, लोककलेचा जागर, एकपात्री महोत्सव, प्रायोगिक नाटक इत्यादी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे, मंजूषा पाटील, सावनी शेंडे आदी ‘प्रातःस्वर’ या कार्यक्रमात सहभागी होतील. 

बीएमसीसीची ‘इतिहास गवा है’ एकांकिका, कलावर्धिनीची ‘तुका म्हणे’ नृत्यनाटिका, सौरभ गोखले यांच्यासारखे कलाकार, तसेच ‘अपूर्व मेघदूत’चा प्रयोग सादर करणारे दृष्टिहीन कलाकार ही पुण्याचे आहेत. संमेलनात यंदा पुण्याची छाप दिसेल.
- मंगेश कदम, प्रवक्ते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

Web Title: marathi natya sammelan