चंगळवादातून मुलांना बाहेर काढा - डॉ. अरुणा ढेरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘चंगळवाद, बाजारीकरण, प्रलोभने, नैराश्‍य यातून मुलांना फक्त शिक्षकच बाहेर काढू शकतात. प्रत्येक मुलामध्ये एक कथा दडलेली असते. ती समजण्यासाठी शिक्षक ती किती समृद्धपणे घेतो, सकसपणे घेतो, यावरच सगळे अवलंबून आहे. मुलांना भाषेचे चांगले ज्ञान देऊन त्यांना प्रलोभने आणि चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजेत,’’ असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

शनिवारवाडा कला महोत्सव आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या वेळी डॉ. ढेरे बोलत होत्या. या प्रसंगी आमदार आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय काळे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, दीपक माळी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाबद्दल हुजूरपागा प्रशालेतील पूर्वी गवळी या विद्यार्थिनीने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.

डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘साहित्यनिर्मितीतून समाज आणि सभोवतालच्या वातावरणाला आवाज मिळू शकतो. मूल्यनिष्ठ समाजाकडे जायचे असेल, तर शिक्षकांनी आपल्या पुढे असणाऱ्या पिढीला घडविले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच त्याबाहेरील जीवनमूल्यांचे शिक्षणही विद्यार्थ्यांना द्यायला हवे. मातृभाषेविषयी प्रेम जागृत करणाऱ्या शिक्षणाचे संस्कार रुजविले पाहिजे. केवळ इंग्रजी भाषेवर अवलंबून न राहता, बहुभाषिक होण्याचा प्रयत्न करावा.’’

‘‘हौस, विरंगुळा म्हणून लिखाण करणे गैर नाही; परंतु साहित्यिक होण्याच्या वाटेवर केवळ आनंद, विरंगुळा म्हणून लिखाण करू नये. तर आपल्या साहित्यनिर्मितीमधून समाजात सकारात्मक बदल, परिवर्तन होणे अपेक्षित आहे.’’ मदन व्हावळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: marathi news aruna dhere children