आराखडा न करताच ‘बालगंधर्व’ पाडणार?

अनिल सावळे 
बुधवार, 7 मार्च 2018

गतवर्षी पावणेदोन कोटी खर्च
गेल्या पाच वर्षांत महापालिकेने ‘बालगंधर्व’च्या देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल सव्वाआठ कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पावणेदोन कोटी रुपये खर्च झाल्याची बाब समोर आली आहे.  

पुणे - शहराचा सांस्कृतिक ठेवा असणारे बालगंधर्व रंगमंदिर कोणताही होमवर्क न करता पाडण्याचा घाट महापालिकेने घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणताही आराखडा किंवा पूर्वनियोजन नसताना आणि नूतनीकरणासाठी प्रशासनाने केवळ ५० लाखांची मागणी केली असताना स्थायी समितीने अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद करून रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेण्याची घाई का केली, यावर प्रश्‍नचिन्ह  निर्माण झाले आहे. 

महापालिका ‘बालगंधर्व’च्या नूतनीकरणासाठी गेल्या पाच वर्षांत सव्वाआठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पावर सभागृहात मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान, दीपक मानकर यांच्यासह काही सदस्यांनी ‘बालगंधर्व’ची वास्तू पाडण्याला विरोध दर्शविला. ही वास्तू पाडण्याचा प्रयत्न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाट्यकर्मी आणि रसिकांनीही सांस्कृतिक वास्तू पाडण्याला विरोध केला आहे. यामुळे ‘बालगंधर्व’चे नूतनीकरण की पुनर्विकास हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गतवर्षी पावणेदोन कोटी खर्च
गेल्या पाच वर्षांत महापालिकेने ‘बालगंधर्व’च्या देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल सव्वाआठ कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पावणेदोन कोटी रुपये खर्च झाल्याची बाब समोर आली आहे.  

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत अद्याप कोणताही आराखडा तयार केलेला नाही. या वास्तूचे नूतनीकरण करायचे की पुनर्विकास?, याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. महापालिकेच्या भवन रचना विभागाने नूतनीकरणाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली होती. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी ते पाडायचे ठरले तरी त्याला एक वर्ष लागेल.
- एस. जी. खांदवे, मुख्य अभियंता, भवन रचना विभाग 

सांस्कृतिक वारसा असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराबाबत पुणेकरांच्या मनात वेगळे स्थान आहे. त्याचा पुनर्विकास करताना ही वास्तू पाडण्याचा निर्णय चुकीचा असून, त्याला आमचा विरोध राहील. 
- शिवा मंत्री, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

पुनर्विकासासाठी समिती नेमणार
‘‘बालगंधर्व रंगमंदिर बांधले, त्या वेळी पुण्याची लोकसंख्या सहा लाख होती. आता ती ४० लाखांवर गेली आहे. रंगमंदिराचे बांधकाम सुमारे ५० वर्षांपूर्वी झाले आहे. पार्किंगची सुविधा अपुरी आहे. शिवाय, एकच कलादालन आहे. अजूनही बांधकाम करण्यासाठी तेथे मोठी जागा उपलब्ध आहे. पुनर्विकासापूर्वी निर्णय घेण्यासाठी कलाकार, वास्तुविशारद, नाट्यकर्मी, सदस्यांची समिती नेमण्यात येईल,’’ असे ‘स्थायी’चे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

...तर कोट्यवधींचा खर्च पाण्यात 
सन २०१६-१७ या वर्षात बालगंधर्वच्या अग्नी प्रतिरोधच्या कामासाठी चार कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत चार कोटी ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच, या कामावर निधी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे हा पैसा खर्च करून पुन्हा बालगंधर्वची वास्तू पाडणार का, असाही प्रश्‍न समोर आला आहे.

सध्या बालगंधर्वमधील सुविधा  
प्रेक्षागृहात वातानुकूलित यंत्रणा, 
पे अँड पार्क वाहनतळ सुविधा, कॅंटीन, नाट्यसंस्थांच्या सेटसाठी गाळे, जाहिरातीसाठी डिस्प्ले बॉक्‍स, नवोदित कलाकारांसाठी कलादालन, निवास व्यवस्था आणि भोजनकक्ष, विशेष अतिथींसाठी व्हीआयपी कक्षाची सुविधा.

बालगंधर्व रंगमंदिरचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ- नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ 
बालगंधर्व यांच्या हस्ते सोमवार, 
ता. ८ ऑक्‍टोबर १९६२ रोजी झाले.
 उद्‌घाटन - तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, 
२६ जून १९६८ रोजी
 उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा सिंहाचा वाटा
 आसन क्षमता- तळमजला- ६६९ आणि बाल्कनी- ३२०

Web Title: marathi news Balgandharva Rangmandir pune PMC