‘पुलं’ना असे अभिवादन करणार का? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी आठ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. बालगंधर्व रंगमंदिर पाडून जन्मशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का, अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगड-विटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सृजन केंद्र आहे. या रंगमंदिरात कला सादर करणे, इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे हे नेहमीच कलावंत आणि रसिकांना गौरवाचे वाटते. या वास्तूची देखभाल राखण्यात अपयशी ठरलेली महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे.  

बालगंधर्व रंगमंदिर शहराचा मानबिंदू असून, कालानुरूप काही बदल आवश्‍यक असतील; परंतु त्यासाठी शहराचे वैभव असलेले रंगमंदिर पाडणे हा पर्याय नाही. कलाकार आणि पुणेकरांना हवेहवेसे वाटणारे रंगमंदिर पाडणे हे अन्यायकारक असून, ते पाडण्यास आमचा विरोध राहील. 
- रमेश बागवे, अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस

कलाकार, नागरिकांची स्वाक्षरी मोहीम
हजारो कलाकारांचे मंदिर आणि शहराचा सांस्कृतिक वारसा असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा कट सूज्ञ पुणेकर उधळून लावतील, असे मत कलाकार सुरेखा पुणेकर यांनी व्यक्‍त केले. शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात कलाकार आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या वेळी उमेश वाघ, राहुल शिरोळे, सुनील महाजन, पवनकुमार, बाबा पठाण, मोहन कुलकर्णी यांच्यासह अभिनेते-कलाकार उपस्थित होते.

Web Title: marathi news Balgandharva Rangmandir pune PMC