‘बालगंधर्व’ पुनर्विकासासाठी तज्ज्ञ समितीबाबत उद्या चर्चा  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. ही तज्ज्ञ समिती स्थापन करण्यासाठी महापौर आणि सभागृह नेत्यांसोबत सोमवारी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

स्थायी समितीने बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेत या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेच्या वेळी नगरसेवक दीपक मानकर यांनी शहराचा सांस्कृतिक वारसा असलेले ‘बालगंधर्व’ पाडण्याला कडाडून विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र साहित्य परिषदेसह कलाकार आणि नाट्यरसिकांनी ‘बालगंधर्व’ पाडण्यास विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल. त्यासाठी कलाकार आणि तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येईल, असे ‘स्थायी’चे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी स्पष्ट केले होते. तसेच, ‘स्थायी’चे नवनिर्वाचित अध्यक्ष मुळीक यांनीही त्या ठिकाणी चार थिएटर, कलादालनासह सुसज्ज सुविधा असलेले बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासासाठी तज्ज्ञ समिती कधी नेमणार आणि त्याबाबत काय निर्णय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news Balgandharva Rangmandir pune PMC