बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी  पहिली यादी 15 जानेवारीला; सनद पडताळणी केलेल्यांना मतदानाचा अधिकार 

बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी  पहिली यादी 15 जानेवारीला; सनद पडताळणी केलेल्यांना मतदानाचा अधिकार 

पुणे : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंत निवडणूक पूर्ण करावी लागणार आहे. 

कौन्सिलची निवडणूक 2010 मध्ये झाली होती. या कार्यकारिणीची मुदत 2015 मध्ये संपली. बोगस वकिलांना अटकाव करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बार कौन्सिलना वकिलांच्या सनद पडताळणीचे आदेश दिले होते. यासाठी मुदतवाढ मिळत गेल्याने बार कौन्सिलची निवडणूक दोन वर्षे लांबणीवर पडली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पडताळणीस मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे बार कौन्सिलच्या निवडणुकीतील अडसर दूर झाला. सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिलची निवडणूक घ्यावी, असे आदेश सर्व राज्यातील कौन्सिलला दिले आहेत. 

या निवडणुकीसाठी पहिली मतदार यादी 15 जानेवारी रोजी जाहीर केली जाईल. त्या वेळी यादीतील त्रुटी, हरकती झाल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल. प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला 15 फेब्रुवारीला सुरवात होईल. सहा आठवड्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या कार्यकारिणीत 25 सदस्य असून, त्यांची निवड पसंतीक्रमानुसार केली जाते. राज्यात 97 हजार, तर पुण्यात 10 ते 12 हजार वकील आहेत. ज्या वकिलांची सनद पडताळणी पूर्ण झाली आहे, ज्यांनी पडताळणीसाठी अर्ज आणि कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल. 


पुण्यातून 22 वकील निवडणूक रिंगणात? 

पुणे जिल्ह्यातून गेल्या वेळी हर्षद निंबाळकर, अहमद पठाण, सुरेशचंद्र भोसले, अविनाश आव्हाड हे वकील निवडून गेले होते. त्या वेळी जिल्ह्यातील 19 वकील रिंगणात होते. या वेळी पुण्यातून 22 वकील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविलेल्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खंडपीठाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनातही इच्छुकांनी पुढाकार घेतला होता. काही नवोदित वकीलही कौन्सिलच्या निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com