पुणे - लॉगइन आयडी आणि पासवर्डसाठी दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा

मिलिंद संगई
शुक्रवार, 16 मार्च 2018

बारामती : दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठीचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात येत नसल्याने सर्वच दिव्यांगाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

राज्य शासनाने दिव्यांगांना देण्यात येणारे प्रमाणपत्र आता ऑनलाईन असणे अनिवार्य केलेले आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा प्रत्येक तालुका पातळीवर असणे गरजेचे असताना सध्या मात्र फक्त पुण्यातील औंध येथील जिल्हा शल्य चिकित्सकांकडेच या यंत्रणेचा लॉग इन आयडी व पासवर्ड असल्याने जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगांना पुण्याचा हेलपाटा करावा लागत आहे. 

जिल्ह्यातील मंचर, दौंड, बारामती व इंदापूर येथे महिन्यातून एक दिवस शिबीर घेऊन दिव्यांगांची तपासणी केली जाते. येथे काही डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करुन त्यांचे दिव्यांगत्व किती प्रमाणात आहे याची शहानिशा करतात. ही कागदपत्रे सदरची डॉक्टर मंडळी पुण्याच्या औंध रुग्णालयात घेऊन जातात तेथे ही सर्व माहिती संगणकामध्ये भरल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळते. वास्तविक ही सर्व सोय प्रत्येक तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयात केल्यास रुग्णांची सोय होऊ शकेल. महिन्यातून एकदाच हे शिबीर असल्याने त्या दिवशी काही कारणाने येता आले नाही तर दिव्यांगांना पुढील महिन्याची वाट पाहत बसावी लागते. 

शासनाच्या नियमानुसार ज्या दिवशी दिव्यांग अशा प्रमाणपत्राची मागणी करेल त्याच दिवशी त्याच्या तपासण्या करुन असे प्रमाणपत्र देणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र या नियमाला केराची टोपलीच दाखविली जात आहे. औंधहून जी दिव्यांग प्रमाणपत्र दिली जात आहे त्याचा दर्जाही कमालीचा निकृष्ट असून त्या प्रमाणपत्रावरील एकही छायाचित्र ओळखू न येण्याच्या स्थितीतील आहे. 

या संदर्भात माहिती घेतली असता सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून जाणारे डॉक्टर्स स्वतः कागद घेऊन जातात व त्याच कागदांवर या प्रमाणपत्रांच्या प्रती प्रिंट करुन आणतात. काही वेळेस प्रिंटर बिघडल्यानंतर तालुक्याहून येणाऱ्या डॉक्टरांकडेच थेट प्रिंटरचीही मागणी केल्याचीही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

लॉग इन आयडी मिळालेला नाही
या बाबत शासनाकडून लॉग इन आयडी व पासवर्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, ते उपलब्ध होताच प्रत्येक शासकीय रुग्णालयाला तो देण्यात येणार आहे. इतर तक्रारींबाबत चौकशी करुन योग्य ती कार्यवाही निश्चितपणे करु, असे पुण्याच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news baramati news handicapped online certificate login id password