स्थलांतरित मुलांचा बारामतीत शाळाप्रवेश

संतोष शेंडकर
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यात ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरीत मुलांना नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून खऱ्या अर्थाने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होत आहे. अशा वंचितांच्या शिक्षणासाठी झटणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. 

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यात ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरीत मुलांना नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून खऱ्या अर्थाने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होत आहे. अशा वंचितांच्या शिक्षणासाठी झटणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. 

चोपडज (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळा पर्णकुटी येथील जिल्हा परिषद शाळेत अकरा मुलांचा काळे यांच्या हस्ते गणवेश, दप्तर व गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशोत्सव नुकताच पार पडला. प्रवेशोत्सवासाठी चोपडजचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गाडे व किरण गाडेकर यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य राखून गणवेश, दप्तर, वह्या, रोपे व खाऊदेखील उपलब्ध केला. याप्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटनेते बापू धापटे होते. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष बाबासाहेब पवार, विस्तार अधिकारी एल. एल. वाघ, विषयतज्ज्ञ सागर गायकवाड, राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष सागर गायकवाड, ग्रामसेवक महादेव नगरे, संजयकुमार भोसले, वैशाली जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमात काळे यांच्या हस्ते गाडे व गाडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधीर गाडेकर यांचा तर पोलिस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला. शाळेसाठी जागा देणारे लालासाहेब गायवाड यांचाही काळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. तसेच शाळेभोवती मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

 काळे म्हणाले, पोटासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसोबत नाईलाजास्तव मुलेही स्थलांतरित होतात. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) नुसार या मुलांना कुठेही शिकण्याचा अधिकार आहे. तो अधिकार बारामती तालुक्यात मिळतो आहे ही आनंदाची बाब आहे. शिक्षण विभागासोबत टाटा ट्रस्टसही कार्यकर्त्यांमार्फत मुलांना गोळा करून शाळेपर्यंत आणण्याचे महत्वपूर्ण काम करत आहे. 

धापटे म्हणाले, स्थलांतरीत मुले शिक्षणात मागे असतात. यांना आपल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे. त्यांना शाळांमध्ये दर्जेदार शालेय पोषण आहार मिळाला पाहिजे. तसेच स्थानिक मुलांसोबत या मुलांना मिसळू द्यावे. त्यांना वेगळेपणाची वागणूक नको. त्यांना आपुलकी वाटली पाहिजे तरच ती शाळेत टिकतील. सरपंच देविदास गाडेकर, माजी सरपंच राजेंद्र गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक मार्गदर्शक राजू बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर महंतेश मुंडेवाडी यांनी आभार मानले.

 

Web Title: Marathi news baramati news migrated students goes into school