बारामतीत व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबत नगररचनाकारांच्या वेगळ्या भूमिका

मिलिंद संगई
बुधवार, 24 जानेवारी 2018

सर्व अटींची पूर्तता केलेली असताना व नागरिकांच्या हिताचे विकास काम असताना स्थगिती का दिली असा सवाल संतप्त नगरसेवकांनी कांबळे यांना विचारला. 

बारामती : शहरातील भिगवण चौकातील व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबत नगररचनाकारांनी दोन वेगळ्या भूमिका घेतल्याने आज बारामतीत हे नाट्य चांगलेच गाजले. नगरपालिका प्रशासनाने आज सकाळी भिगवण चौकातील व्यापारी संकुलाच्या उर्वरित कामास प्रारंभ केला. नगररचनाकार संभाजी कांबळे यांनी या बांधकामास परवानगी दिल्यानंतरच नगरपालिकेने हे काम रितसर सुरु केले.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवकांच्या उपस्थितीत सकाळी जेसीबी यंत्राने या भागाची स्वच्छता सुरु झाली. हे काम सुरु करताना प्रशासनाने काही गडबड होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्तही घेतलेला होता. हे काम सुरु झाल्याची माहिती विरोधकांना लागताच भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी तातडीने नगररचनाकारांकडे धाव घेत या कामास स्थगिती देण्याची मागणी केली. त्यांच्या पत्रानुसार संभाजी कांबळे यांनी तातडीने नगरपालिकेच्या कामास स्थगिती देत असल्याचे लेखी पत्र जेवरे यांना दिले. 

जेवरे यांनी स्थगितीचे पत्र मिळविल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समजताच पौर्णिमा तावरे, जय पाटील, सचिन सातव, किरण गुजर यांच्यासह सविता जाधव, अनघा जगताप, सीमा चिंचकर, ज्योती सरोदे, अश्विनी गालिंदे, नीता चव्हाण, अनिता माने, मयूरी शिंदे, अनिता जगताप, सत्यव्रत काळे, अभिजित जाधव, समीर चव्हाण, नवनाथ बल्लाळ, संतोष जगताप, सूरज सातव, गणेश सोनवणे, बाळासाहेब सातव, मयूर लालबिगे यांनी नगररचनाकारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनच सुरु केले.

सर्व अटींची पूर्तता केलेली असताना व नागरिकांच्या हिताचे विकास काम असताना स्थगिती का दिली असा सवाल संतप्त नगरसेवकांनी कांबळे यांना विचारला. 

तसेच जोपर्यंत स्थगिती उठविल्याचे पत्र देत नाही तोपर्यंत दारात आंदोलन करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर संभाजी कांबळे यांनी पुन्हा नगरपालिकेने अहवाल सादर केल्याने बांधकाम मंजूरीची शिफारस कायम ठेवत असल्याचे पत्र नगरसेवकांना दिले. हे पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजितदादा झिंदाबादच्या घोषणा दिल्या. दुसरीकडे सुरेंद्र जेवरे यांनीही या विषयाबाबत आता उपोषण करणार असल्याचे पत्र नगरपालिकेस दिले आहे.

Web Title: Marathi news Baramati News nagar rachanakar has two point of views vyapari sankul