बारामतीत स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

मिलिंद संगई
मंगळवार, 16 जानेवारी 2018

बारामती : विद्यार्थी हेच खरे स्वच्छतादूत आहेत, त्यांनी निश्चय केला तर बारामती शहर प्लॅस्टिकमुक्त तसेच कचरामुक्त होऊ शकते, विद्यार्थ्यांनी आजपासूनच ही चळवळ सुरु करावी, अशी अपेक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. 

बारामती : विद्यार्थी हेच खरे स्वच्छतादूत आहेत, त्यांनी निश्चय केला तर बारामती शहर प्लॅस्टिकमुक्त तसेच कचरामुक्त होऊ शकते, विद्यार्थ्यांनी आजपासूनच ही चळवळ सुरु करावी, अशी अपेक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. 

बारामती नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करताना त्या बोलत होत्या. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपनगराध्यक्ष जय पाटील, गटनेते सचिन सातव, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 
आज बारामती शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये नागरिकांसह स्थानिक आजी माजी नगरसेवक तसेच विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत बारामती शहराची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. 17) केंद्र शासनाचे पथक येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती शहर गेल्या काही दिवसात चकाचक करण्यात आले आहे. आज शहराच्या सर्वच प्रभागात स्वच्छता मोहिम राबविली गेली. शारदा प्रांगणामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संदेश देताना सुनेत्रा पवार यांनी असे आवाहन केले की, मुलांनीच प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग वापरणार नाही व घरातही कॅरिबॅग आणू देणार नाही. असा निश्चय केला तर पालकही कापडी पिशव्या वापरु लागतील. 

एकेका घरातून प्लॅस्टिकमुक्तीचे अभियान सुरु झाले तर ती काही दिवसात एक चळवळ होईल. प्लॅस्टिकने अनेक भीषण समस्या उभ्या आहेत, मुलांनीच या बाबत पुढाकार घ्यायला हवा. या प्रसंगी प्रास्ताविकात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी या अभियानाची माहिती दिली. माझी बारामती नगरी असून तिला पारितोषिक मिळविण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन तावरे यांनी या वेळी केले. मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबतची माहिती दिली. या अभियानादरम्यान शहरातील अनेक प्रभागात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अनेकांनी श्रमदान करीत परिसर स्वच्छता केली. 

Web Title: Marathi news baramati news swachta abhiyan