भरतनाट्यममधून शिवचरित्राचा वेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

नृत्यदिग्दर्शक वैभव आरेकर भरतनाट्यमच्या माध्यमातून श्रीमंत योगी हा नाट्य नृत्याविष्कार सादर केला. हा नृत्य नाट्याविष्कार सिंधू महोत्सवाच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. या अनोख्या प्रयत्नाविषयी ‘सकाळ’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

सिंधू नृत्य महोत्सवाविषयी काय सागाल?
-  सिंधू प्राचीन नदीचे नाव असून ती सातत्याने वाहत असते. त्याचप्रमाणे शास्त्रीय नृत्य कलादेखील फार पूर्वीपासून वाहत आहे. अशा या वाहत येणाऱ्या प्राचीन परंपरेला मेहनतीची जोड देऊन पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे या शास्त्रीय नृत्याला सिंधू महोत्सव हे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सिंधू हे माझ्या आईचे नाव आहे. आज मी जे काही घडलो आहे यात आईचा सर्वाधिक वाटा आहे. 

भरतनाट्यमच्या माध्यमातून श्रीमंत योगी हा प्रयोग सादर करणे कितपत अवघड वाटते?
- श्रीमंत योगी या प्रोजेक्‍टवर काम करण्यासाठी पाच ते सहा महिने इतका वेळ लागला. ही ऐतिहासिक बाजू असल्याने जबाबदारीने काम करणे आवश्‍यक होते. यामुळे सर्वांनी बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके वाचली. त्याचबरोबर कॅसेट्‌सच्या माध्यमातूनदेखील अभ्यास केला. तसेच कलाकारांनीदेखील खूप मेहनत घेतली आहे. या नृत्याविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे ध्येय आहे. 

चित्रपट, नाटक या माध्यमातून शिवचरित्र उलगडले आहे. भरतनाट्यमच्या माधयमातून हे चरित्र तरुणांपर्यंत कसे पोचविणार?
- महाराजांच्या आयुष्याचे एक तत्त्वज्ञान आहे. भरतनाट्यमच्या माध्यमातून त्यावर भर देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर शिवरायांच्या जन्माअगोदरची महाराष्ट्राची परिस्थिती, शिवरायांचा जन्म, त्यांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, शिवरायांचा राज्याभिषेक, आंतरिक तसेच अध्यात्मिक संघर्ष आणि कर्मयोगी छत्रपती होण्याचा प्रवास या सर्व गोष्टी शास्त्रीय नृत्यातून मांडण्याचा प्रयत्न आहे. सर्वप्रथम शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत भरतनाट्यमच्या माध्यमातून महाराजांचे विचार पोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून तरुणांना भरतनाट्यमद्वारेदेखील शिवचरित्र कळू शकेल.

सध्याची परिस्थिती पाहता ऐतिहासिक विषय हाताळण्याचे धाडस कसे केले?
- श्रीमंत योगी हा विषय चुकीचा की बरोबर या अर्थाने मांडत नाही. जे वाचनात आले आहे तेच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काहीही बदल करण्यात आला नाही. ऐतिहासिक विषयांबाबत जे बदल करतात ते वादग्रस्त ठरतात.

आजची तरुणाई ही पारंपरिक नृत्याकडे दुर्लक्ष करत आहे का?
- आजची मुले पूर्णपणाने झोकून देऊन काम करत नाहीत. ते रिॲलिटी शोमध्ये एका नृत्यापुरतेच नृत्य करत असतात. हे क्षणिक सुख असल्याची जाणीव त्यांना नसते. फक्त झटपट पैसा आणि प्रसिद्धीसाठी मुले रिॲलिटी शोकडे आकर्षित होतात. पारंपरिक नृत्याचे परिपक्व सादरीकरण दाखविणे आवश्‍यक आहे. 

रिॲलिटी शोविषयी काय सांगाल?
- रिॲलिटी शो हे कमर्शियल असतात. चार ते पाच वर्षे सराव करणारे नृत्य कोणी तीन मिनिटांत सादर करू शकत नाही. प्रवाहाच्या विरोधी जाणारी माणसे वेगळी असतात. यांच्यासाठी कला हा खेळ झाला आहे. शेवटी आयुष्यात कसे जगता आले पाहिजे हेदेखील महत्त्वाचे असते.

Web Title: marathi news Bharatanatyam vaibhav aarekar