विद्यार्थ्यांनी विज्ञान स्पर्धांची संधी सोडू नये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी मुक्तांगण विज्ञान शोधिकेच्या उपसंचालक (शैक्षणिक विभाग) भारती बक्षी वीस वर्षे कार्यरत आहेत.  यांच्याशी नीला शर्मा यांनी विज्ञान दिनानिमित्त साधलेला संवाद...

प्रश्न - आपल्या कामाची थोडक्‍यात पार्श्वभूमी सांगा.
बक्षी -
भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेची उपसंचालक (शैक्षणिक विभाग) या पदावर मी वीस वर्षांपासून काम करते आहे.  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. भिडे यांनी या संस्थेची स्थापना केली तीच मुळी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जोपासली जावी, इथे येणाऱ्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी, त्यांना कृतीतून सहज शिक्षण देणारे वातावरण, सुविधा आणि मार्गदर्शन पुरवले जाते. कित्येकदा शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकी विज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी मेळ दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना हा विषय आपलासा वाटत नाही. तेच गणित विषयाचे. मात्र, आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना विज्ञानाचे रोजच्या जगण्यातले उपयोजन रंजक पद्धतीने मार्गदर्शकांकडून कळते. स्वतः प्रयोग करून मुले त्याचे व्यवहारात रूपांतर करून पाहतात. नवे काही घडविण्याचा आनंद घेतात. त्यासाठी वर्षभराचा एक कार्यक्रम, शिवाय उन्हाळी सुटीच्या कालावधीत व इतर लहान-मोठे शैक्षणिक कार्यक्रम, उपक्रम सतत चालवले जातात. त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या व कार्क्षमतेचा चढता आलेख सुखावणारा आहे.

प्रश्न - मुलांना विज्ञान भावतंय, हे कशावरून लक्षात येतं?
बक्षी -
इथं जे करून पाहिले, ते नंतर शालेय अभ्यासक्रमातले धडे समजून घेताना उपयोगी पडले, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. धड्यांमध्ये सांगितलेल्या संकल्पना स्पष्ट झाल्या. स्वतः प्रयोग करून पाहिल्यामुळे विज्ञानाबद्दलची नावड, दडपण नाहीसे झाले. अनेक गोष्टी हाताळण्यामुळे विषयात सोपेपणा जाणवला आणि गोडी निर्माण झाली, असेही सांगितले जाते. एरो मॉडेलिंग, टेलिस्कोप तयार करणे, तसेच सौरचूल तयार करणे यांसारख्या प्रयोगांमुळे तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत विज्ञान सोपेपणाने पोहोचते. आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा वगैरेही नसते. शाळांनी सुचवले म्हणून किंवा स्वतःच्या मर्जीनुसार विद्यार्थी येत असतात. यंदाच्या विज्ञान दिनानिमित्त संस्थेत दोन दिवस चालणाऱ्या आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, ही समाधानकारक गोष्ट आहे. त्यांत वीजनिर्मिती, प्रदूषण, भूकंप किंवा आगीसारख्या आपत्तींशी मुकाबला करायला सुरक्षायंत्रणा वगैरे तऱ्हेतऱ्हेचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. हे पाहून या मुलांमध्ये सामाजिक समस्यांवर मात करण्याची सज्जता व जीवन सुकर करण्यासाठी  वैज्ञानिक दृष्टी विकसित होत असल्याचेच स्पष्ट होते.

प्रश्न - हे शिकताना, प्रयोग करताना तुम्हाला मुला- मुलींमध्ये कुठली वैशिष्ट्ये दिसतात?  
बक्षी -
मुला-मुलींमध्ये समानता दिसत असली, तरी निसर्गतः काही स्वभाव वैशिष्ट्ये दिसतात. जीवनातील अर्थपूर्णता व सौंदर्यर्बोधात्मक स्वाभाविक जाणिवांमुळे की काय, पण मुली जीवशास्त्र, रसायनशास्त्र आदींकडे अधिक झुकताना आढळतात.  मुलगे पदार्थविज्ञान व इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडे वळताना अधिक दिसतात. हे सारे असले तरी मला वाटते, की आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विज्ञान स्पर्धांसाठी सज्ज व्हावे. आपली काही मुले आजवर अशा स्पर्धा जिंकून आली आहेत, पण ही संख्या व त्यांचा विज्ञानातला सखोल अभ्यास वाढायला हवा. पालकांनी मुलांना फक्त कोचिंग क्‍लासेस आणि मार्कांच्या चक्रात जुंपू नये. त्याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी होत नाही. त्यापेक्षा जीवनमूल्ये समजतील असे वातावरण उपलब्ध करून देणे, जीवनकौशल्य वाढीस लागेल, अशी वैज्ञानिक दृष्टी निर्माण करणे,  आयुष्यात सकारात्मकता व अभिरुची वाढीस लागण्यासाठी प्रोत्साहन देणे हे पालक, शिक्षक व इतरही समाजघटकांकडून व्हायला हवे आहे.

Web Title: marathi news Bharti bakshi interview student science