अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा

संजय बेंडे
गुरुवार, 15 मार्च 2018

भोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.

भोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.

दिघी, भोसरी परिसरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. अशी बांधकामे करणारे काही स्थानिक राजकीय नेत्यांना भेटून बांधकामांना अभय मिळविण्यासाठीचा प्रयत्न करतात. काहींना राजकीय अभय मिळत असल्याने अनधिकृत बांधकामे जोरात होताना दिसतात. त्यांच्या मालकांना महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत नोटिसा बजावून त्यांची स्वाक्षरी घेतात. स्वाक्षरीस नकार देणाऱ्यांच्या बांधकामांवर नोटिसा लावून छायाचित्रे घेतली जातात. पंचनामे केले जातात. त्याची नोंद ठेवली जाते. मात्र, काही जण अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना खोट्या नोटिसा बजावून पैसे उकळत आहेत. याबाबत महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पैसे घेण्याचा अधिकार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे पैसे उकळणारे आमचे कर्मचारी नाहीत.’

अशी होते फसवणूक
 दोन-तीन जणांच्या टोळक्‍याद्वारे सकाळी अनधिकृत बांधकाम गाठून बांधकाम पाडण्याची नोटीस भिंतीवर चिकटविली जाते. 
 नोटीस चिकटविल्याचे छायाचित्र काढून झाल्यानंतर नोटीसही काढून टाकली जाते. 
 महापालिकेद्वारे बांधकाम पाडून टाकू, अशी धमकी अनधिकृत बांधकामधारकास दिली जाते.
 बांधकाम पडण्याच्या भीतीतून बांधकाम मालकाद्वारे पैसे दिले जातात. 
प्रकार वाढण्याची कारणे
 बांधकाम अनधिकृत असल्याने त्याचा मालक वाच्यता करण्याचे टाळतो.
 पैसे देऊन बांधकाम वाचविल्याचे क्षणिक समाधान मिळते.
 विनासायास पैसे मिळत असल्याने टोळक्‍यांच्या मनोधैर्यात वाढ.

महापालिकेद्वारे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाचा आराखडा महापालिकेकडून मंजूर करून रीतसर बांधकामे करावीत. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. योग्य कारवाई केली जाईल.
- विकास डोळस, नगरसेवक

अनधिकृत बांधकामावर दंड आकारण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेऊन नोटीस बजावली जाते. दंडाची रक्कम चलनाद्वारे भरावी लागते. अनधिकृत बांधकामधारकांनी पावतीशिवाय कोणाला पैसे दिल्यास त्या बांधकामावरील कारवाई थांबविली जाते, असे होत नाही.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता

मुळात नागरिकांनीच अनधिकृत बांधकामे करू नयेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांद्वारे पैसे उकळले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही पैसे देऊ नये व फसवणुकीला बळी पडू नये.
- हिराबाई घुले, नगरसेविका

Web Title: marathi news bhosari news illegal construction bogus notice