शिधापत्रिकाधारकांची भोसरीत गैरसोय

संजय बेंडे
शुक्रवार, 16 मार्च 2018

भोसरी - पॉस यंत्रातील त्रुटी बरोबरच अन्य कारणांमुळे भोसरीतील पाच रेशनदुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत. पॉस यंत्रातील त्रुटी त्वरित दूर न केल्यास आणखी काही दुकाने महिनाअखेरीपर्यंत बंद होण्याची शक्‍यता रेशन दुकानदारांच्या संघटनेने वर्तविली आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या दुकानांमुळे अन्य दुकानांकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत असून, त्यामुळे तारांबळ उडत आहे. तरी ही समस्या दूर करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.

नागरिकांची अडचण
इंद्रायणीनगरमधील रेशन दुकान पाडण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी माहिती देणारा कोणताच फलक लावण्यात न आल्याने नागरिकांची अडचण होत आहे. काही दुकानदारांनी शटरवर लावलेला सूचनेचा कागद गळून पडल्याने नागरिकांना दुकान बंद झाल्याचे कळलेच नाही.

दुकाने बंद होण्याची कारणे
    पॉस यंत्रातील त्रुटीमुळे रोजच शिधापत्रिका धारकांबरोबर उडणारे खटके
    धान्य वितरणासाठी अधिक लागणारा वेळ
    कमी झालेले कमिशन
    ऑनलाइन वितरणामुळे आवक-जावक धान्याची तंतोतंत ठेवावी लागणारी आकडेवारी 
    अधिकचे रॉकेल, धान्य वितरणात अडचणी
    वैयक्तिक अडचण

निर्माण झालेल्या समस्या
    सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य मिळण्यात अडचण
    अन्य दुकानदारांवर धान्य वितरित करण्याचा ताण
    नाव जोडलेल्या नवीन दुकानाची माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय 
    दुकान बंद झाल्याने काही अंत्योदय कार्डधारकांना फेब्रुवारी महिन्यातील शिधाच मिळाली नाही

बंद झालेल्या रेशन दुकानातील शिधापत्रिकाधारकांना जवळच्या दुकानाशी जोडले आहे. पॉस यंत्राचे सर्व्हर सुस्थितीत सुरू राहिल्यास प्रत्येकाला पाच मिनिटांत धान्य मिळू शकेल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
- नागनाथ भोसले, अधिकारी, परिमंडळ फ अन्नधान्य वितरण विभाग

लांडेवाडीतील रेशनचे दुकान बंद झाल्याने फेब्रुवारी महिन्यातील शिधा मिळालेली नाही. बुधवारी (ता. १४) लांडेवाडी झोपडपट्टीतील दुकानाबाहेर तीन तास थांबूनही यंत्रातील बिघाडामुळे धान्य मिळाले नाही. आमच्या समस्या सरकारने दूर कराव्यात.
- वसंत निवृत्ती जगताप, शिधापत्रिकाधारक

पॉस यंत्राद्वारे शिधावाटपास आमची हरकत नाही. मात्र ही यंत्रणा सुरळीत सुरू असावी. दुकानाचे भाडे व इतर खर्च भागेल एवढे मानधन सरकारने दुकानदारांना दिले पाहिजे. त्याचप्रमाणे धान्याचे पैसे चलनाद्वारे न घेता ऑनलाइन सुविधेद्वारे स्वीकारल्यास दुकानदारांचा वेळ वाचेल.  
- निवृत्ती फुगे, अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड

Web Title: marathi news bhosari news ration card issue