अभ्यासक्रमांमध्ये "बोन्साय'चा समावेश करावा 

अभ्यासक्रमांमध्ये "बोन्साय'चा समावेश करावा 

पुणे  - आपल्याच देशात उगम पावलेली बोन्साय कला आज जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे. मात्र, अद्यापही या कलेबद्दल आपल्याकडे माहिती नाही. या कलेच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय निर्माण व्हावा; तसेच या कलेचा प्रसार व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि तो साध्य होण्यासाठी कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील अभ्यासक्रमांमध्ये शासनाने त्याचा समावेश करावा, असे मत बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी व्यक्त केले. 

"बोन्साय नमस्ते'तर्फे भरविण्यात आलेल्या पहिल्या जागतिक परिषदेत दुसऱ्या दिवशी राज्यभरातील कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील शिक्षकांना; तसेच कृषी अधिकाऱ्यांना बोन्सायचे मोफत प्राथमिक शिक्षण देण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी इंडोनेशियातील प्रसिद्ध बोन्साय मास्टर रुडी नाजोन, शिरसो गावातील कृषी चिकित्सालय वाटिकेचे प्रशांत वानखेडे आदी उपस्थित होते. काळे म्हणाल्या, ""आपल्या देशात नागरिकांना फलोत्पादनाची आवड नाही. परदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणी नागरिक शनिवारी व रविवारी निसर्गाच्या जवळ जात बागकामात रमताना पाहायला मिळतात.'' 

परिषदेत बोन्सायचे विविध प्रकार, प्री बोन्साय मटेरिअलपासून बोन्साय होण्यापर्यंतची प्रक्रिया, बोन्सायला आकार देणे, त्यांची मुळे योग्य पद्धतीने कटिंग करणे, बोन्सायसाठी आवश्‍यक असलेल्या मातीची माहिती घेणे याबरोबरच बोन्साय संबंधीचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सहभागी झालेले सातारा जिल्ह्यातील कृषी चिकित्सालयाचे कृषी अधिकारी निवासराव खबाले म्हणाले, ""या परिषदेमुळे एक नवीनच कला लोकांसमोर येत आहे. या ठिकाणी बोन्साय निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन आमच्या भागात या कलेला प्रोत्साहित करण्यात येईल. शेतकऱ्यांना ही कला कळाली तर शेतातील फार उपयोगात न येणाऱ्या झाडांना बोन्सायचे रूप देऊन त्यांना रोजगार मिळेल. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना बोन्साय कला व्यवसायाचा चांगला पर्याय ठरू शकतो.'' 

हे प्रदर्शन येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाचे मैदान येथे सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com