पावणे दोन लाख वाहने "सीएनजी'वर 

महेंद्र बडदे
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - शहरातील सुमारे पावणे दोन लाख वाहने सीएनजी या इंधनावर चालतात. गेल्या दोन वर्षांत या इंधनाचा वापर वाढला आहे. साधारणपणे प्रति दिन साडेचार लाख किलो सीएनजी गॅसचा खप होत आहे. 

पुणे - शहरातील सुमारे पावणे दोन लाख वाहने सीएनजी या इंधनावर चालतात. गेल्या दोन वर्षांत या इंधनाचा वापर वाढला आहे. साधारणपणे प्रति दिन साडेचार लाख किलो सीएनजी गॅसचा खप होत आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून शहरांत एलपीजी, सीएनजी या पर्यायी इंधनाचे वितरण सुरू झाले. सीएनजीच्या वापराविषयी झालेली जागरूकता, पंधरा वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना सीएनजी किट बसविण्याचे बंधन अशा विविध कारणांमुळे सीएनजीचा वापर वाढू लागला आहे. दोन वर्षांपूर्वी "सीएनजी' पंपाची संख्या पुरेशी नसल्याने या पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत. विशेषत: रिक्षाचालकांना याचा फटका अधिक बसत होता. 2016-2017 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पंपाची संख्या 42 पर्यंत नेली आहे. आतिापर्यंत 51 पंप कार्यान्वित केले आहे. पुढील काळात ही संख्या 70 पर्यंत नेण्याचे कंपनीचे धोरण आहे. 

पेट्रोल आणि डिझेल या दोन इंधनाच्या तुलनेत सीएनजीचा दर परवडत असल्याने विशेषत: रिक्षाचालक, कॅबचालक (चार चाकी प्रवासी वाहतूक) यांच्याकडून सीएनजीचा वापर वाढला आहे. शहरांतील सुमारे 50 हजार 305 रिक्षा आणि सुमारे 1 लाख 24 हजार 42 चार चाकी वाहने या सीएनजी या इंधनावर चालतात. चार चाकी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक आणि खासगी वाहनांचा समावेश आहे. पीएमपीच्या सुमारे 1 हजार 235 बसेसमध्ये सीएनजीचा उपयोग केला जात आहे. 

रिक्षांचालकांकडून सीएनजीच्या वापराला सुरवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2012 -2013 या आर्थिक वर्षी सुमारे 28 हजार 371 रिक्षा सीएनजीवर धावत होत्या. ती संख्या आज 50 हजारांच्या पुढे गेली आहे. 2012 -2013 या आर्थिक वर्षी सीएनजीवर धावणाऱ्या चार चाकी वाहनाची संख्या सुमारे 15 हजार 230 होती. ती या वर्षी 1 लाख 24 हजारांपर्यंत पोचली आहे. 

सीएनजीच्या मागणीत दरवर्षी साधारणपणे 20 ते 25 टक्के इतकी वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन पुढील दोन वर्षांत पंपांची संख्या 70 पर्यंत नेण्याचे आमचे धोरण आहे. जागा मिळविण्यासाठी अडचणी येत असून, पुणे महापालिकेकडे आठ ठिकाणी जागांची मागणी केली आहे. पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, पुणे कॅंटोन्मेट बोर्ड यांच्याकडेही जागेची मागणी केली आहे. 
- संतोष सोनटक्के 

गेल्या वीस वर्षांपासून मी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत आहे. सहा वर्षांपासून सीएनजीचा वापर करू लागलो. पूर्वीच्या तुलनेत उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर परवडत नाही, प्रवाशांच्या शोधात जास्त फिरता येत नव्हते, सीएनजीचा वापर सुरू केल्यापासून इंधन खर्च कमी झाला आहे. प्रवाशांच्या शोधात जास्त फिरावे लागले तरी सध्या परवडते. 
- संजय वाळुंजकर, रिक्षाचालक 

सीएनजीच्या पुरवठ्यासाठी रिक्षा पंचायत नेहमीच आग्रही राहिली आहे. पंपावरील रांगा कमी झाल्या नाहीत, प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पुरवठ्याचे एक युनिट सुरू केले, तर त्याचा फायदा होईल. 
- नितीन पवार, समन्वयक, रिक्षा पंचायत 

Web Title: marathi news CNG GAS pune