संरक्षण विभागातील प्रश्न सोडविणार

संरक्षण विभागातील प्रश्न सोडविणार

मांजरी : शहर परिसरातील संरक्षण विभागाच्या हद्दीतील विविध प्रश्र्न सोडविण्याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी हिरवा कंदील दिला आहे. या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. कोंढवा लुल्लानगर येथील फकरी हिल परिसरातून जाणारी जल वाहिनी व दिघी, भोसरी, रूपीनगर, तळवडे येथील "रेडझोन''चा प्रश्र्न गेली अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्याला परवानगी मिळावी, यासाठी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री सीतारामन यांची भेट घेतली. खासदार द्वयिंनी तेथील प्रश्र्नांचे गांभीर्य सितारामन यांच्या लक्षात आणून दिले. लागलीच सितारामन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून याविषयी गांभिर्याने लक्ष घालण्याचे व संपूर्ण माहिती सादर करून बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

रोडझोन प्रश्नाबाबत खासदार आढळराव पाटील यांनी आजवर केलेला पाठपुरावा आणि स्थानिक जनतेच्या रेडझोनची हद्द ६० मीटर इतकी कमी करण्याची मागणीबाबत संरक्षणमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये सन २०१३ मध्ये लोकसभेच्या पिटीशन कमिटीने केलेला दौरा, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्किकर यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेली सकारात्मक भूमिका आदींची माहिती आढळराव पाटील व खासदार श्रीरंग बारणे यांनी सीतारामन यांना दिली. 
कोंढवा, लुल्लानगर येथील फकरी हिल परिसरात पिण्याची पाईपलाईन टाकण्यास संरक्षण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे खासदार आढळराव पाटील यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांचे लक्ष वेधले. गेली काही वर्ष आपण या पाईपलाईनचे काम करण्यास परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत असून कुठल्याही प्रकारची संरक्षण विभागाची सुरक्षितता बाधित होत नसतानाही या पाईपलाईनसाठी संरक्षण विभागाकडून परवानगी मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी महापालिकेला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे फकरी हिल परिसरात संरक्षण विभागाच्या जागेतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यास तत्काळ परवानगी मिळावी अशी मागणी खासदार आढळराव पाटील यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांच्याकडे केली. 

"रेडझोन' चा प्रश्न सोडवताना प्रत्येक वेळी आश्वासक वातावरण तयार होत असतानाच कधी संरक्षणमंत्री तर कधी दक्षिण कमांडचे प्रमुख बदलतात. त्यामुळे प्रत्येकवेळी नवीन मंत्री, नवीन दक्षिण कमांडचे प्रमुख यांना हा प्रश्न समजावून सांगावे लागते. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळताच त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र, ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने हा प्रश्न सुटण्यात अडचण आली. त्यामुळे आता हा प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागली आहे. आपण हा प्रश्न सोडविण्यासाठी चिकाटीने पाठपुरावा करणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. या दोन्ही प्रश्नांसंदर्भांत सकारात्मक प्रतिसाद देत शक्य झाल्यास सध्याचे सुरु असलेले अधिवेशन संपण्यापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले असल्याचे खासदार आढळराव पाटील व खासदार बारणे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com