डीएसके दांपत्यास न्यायालयीन कोठडी 

 डीएसके दांपत्यास न्यायालयीन कोठडी 

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती (दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला. डीएसके दांपत्यांची पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली होती. आता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने त्यांचा पुढील मुक्काम येरवडा कारागृहात असेल. 

"पोलिस कोठडीत असताना डीएसके यांना आवश्‍यक वस्तूदेखील पुरवल्या गेल्या नाहीत. तब्येत बिघडली असतानाही पोलिसांनी त्यांना थंड पाण्याने अंघोळ करण्यास भाग पडले,' अशी माहिती डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयाला दिली. 

दरम्यान, "मला मरण्यापूर्वी ठेवीदारांचे पैसे परत करायचे आहेत' असे म्हणत डीएसके न्यायालयातच रडू लागले; परंतु उपस्थित तक्रारदारांनी "डीएसके हे नाटक करत असून, अशा नाटकी रडण्यावर विश्वास ठेवू नये. त्यांच्यावर दया दाखवत असाल तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांवरही दया दाखवा,' अशी विनवणी केली. त्यानंतर न्यायालयाने गुंतवणूकदारांचे हित महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीने न्यायालय भूमिका बजावेल, अशी तोंडी ग्वाही त्यांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला संघर्ष समितीच्या महिलांनी डीएसके विरोधात घोषणा दिल्या. 

न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी डीएसके दांपत्याला पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, डीएसकेंची प्रकृती बिघडल्याने पोलिस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयाने डीएसकेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. 23 फेब्रुवारीला डीएसकेंची तब्येत चांगली असल्याचा अहवाल ससून रुग्णालय मेडिकल बोर्डाने दिला. त्यानुसार त्यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ती मुदत गुरुवारी संपली. डीएसकेंना पुन्हा हजर केल्यानंतर न्यायालयाने 15 मार्चपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com