जबर मार लागल्यास फाटू शकतो डोळ्याचा पडदा 

जबर मार लागल्यास फाटू शकतो डोळ्याचा पडदा 

रंगपंचमीच्या सणाला मित्रांनी डोळ्यावर रंगाच्या पाण्याचा फुगा मारला, जोरदार फटक्‍यामुळे एका 31 वर्षीय युवकाच्या डोळ्याला इजा होऊन पडदा (रेटिना) फाटला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डोळ्यावर "हायपरसॉनिक व्हिट्रेक्‍टॉमी' शस्त्रक्रिया करावी लागली. तत्काळ वैद्यकीय उपचार दिल्यामुळे अनर्थ टळला. मात्र, उशीर झाला असता तर दृष्टी कायमची गेली असती. 

सण-उत्सवामध्ये उत्साहाच्या भरात कोणालाही शारीरिक इजा होऊ शकते आणि त्यामुळे एखादा अवयव निकामीदेखील होऊ शकतो. हे वरील घटनेच्या निमित्ताने पुढे आले. कौस्तुभ (नाव बदलले आहे) रंगपंचमीच्या दिवशी सायकलवरून कामानिमित्त बाहेर जात होता. परंतु, अचानक मित्रांनी गराडा घालून त्याला रंग लावला. उत्साहाच्या भरात डोळ्यावर फुगा फेकून मारल्याने डोळ्याला गंभीर दुखापत होऊन दृष्टी गमावण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. परंतु, तत्काळ वैद्यकीय उपचार व वेळेत शस्त्रक्रिया झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

या शस्त्रक्रियेसंदर्भात "राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थे'चे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी-एनआयओ) संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""डोळ्यांद्वारे नेत्रपटलावर पडलेले चित्र ओळखण्याचे काम मेंदू करतो. नेत्रपटल एकूण दहा थरांनी बनलेले असते. त्यापैकी एकत्र असलेल्या नऊ थरांना "सेन्सरी रेटीना' म्हणतात आणि "रेटिनल पिगमेंट इपीथेलियम' हा दहावा थर लवचिक हलता असतो. मार बसल्यानंतर "सेन्सरी रेटीना'ला छिद्रे पडतात. त्यानंतर डोळ्यातील द्रव पदार्थ "सेन्सरी रेटीना'च्या मागे जातो. त्याला नेत्रपटल किंवा पडदा सरकणे असे म्हणतात. कौस्तुभच्या बाबतीत तोच प्रकार घडला. त्याला मुळात चष्मा होता. डोळ्यावर पाण्याने भरलेल्या फुग्याचा मार बसल्याने पडद्याला छिद्रे पडली होती. त्यामुळे डोळ्याला अंधारी येणे, काजवे चमकणे किंवा दृष्टी अंधूक होणे असा त्रास त्याला होत होता. या घटनेनंतर सुमारे आठ तासांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची तपासणी केली असता डोळ्यातील पडदा फाटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे "हायपरसॉनिक व्हिट्रेक्‍टॉमी' ही बिनटाक्‍याची रेटिनाची शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेनंतर काचबिंदू, मोतीबिंदू पुन्हा सरकण्याचा धोका असतो. या शस्त्रक्रियेला साधारण साठ ते ऐंशी हजार रुपये खर्च होतो. दुर्लक्ष केल्यास दृष्टीदेखील जाऊ शकते.'' 

"हायपरसॉनिक व्हिट्रेक्‍टॉमी' म्हणजे काय? 
मार बसल्यानंतर "सेन्सरी रेटीना'ला छिद्रे पडतात व डोळ्यातील द्रव पदार्थ "सेन्सरी रेटीना'च्या मागे जाऊन हळूहळू पसरण्यास सुरवात होते. त्यामुळे डोळ्यांवर ही शस्त्रक्रिया करावी लागते. त्याद्वारे डोळ्याच्या आतील रेटिनाच्या पुढे असलेला द्रव पदार्थ अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने सूक्ष्म स्वरूपात कापून काढावा लागतो. तसेच त्यामध्ये "सिलिकॉन ऑइल' टाकले जाते. "लेसर' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली काही आठवड्यांच्या आरामानंतर डोळ्यांची दृष्टी पूर्ववत होते. 

लक्षणे 

  • अचानक डोळ्यांवर प्रकाश पडल्यासारखे वाटणे 
  • काजवे चमकल्यासारखा भास होणे 
  • डोळ्याला अंधारी येणे 
  • डोळ्यापुढे काळे ठिपके दिसणे 
  • अंधूक दिसणे 
  • दृष्टी जाणे 

खालील तपासण्यांद्वारे निदान होईल 

  • डोळ्याची ऑप्थॅल्मोस्कोपी 
  • अल्ट्रासाउंड बी स्कॅन 

नेमकी कारणे कोणती? 

  • आनुवंशिकता 
  • डोळ्याच्या चष्म्याचा उणे क्रमांक जास्त असणे 
  • डोळ्याला जबर मार लागणे 

कोणती खबरदारी व काळजी घ्यावी 

  • डोळ्याला संरक्षक चष्मा वापरणे 
  • डोळ्याला इजा होणार नाही याची दक्षता घेणे 
  • वरील लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com