किल्लेभ्रमंतीतून इतिहास, भूगोलाची माहिती

किल्लेभ्रमंतीतून इतिहास, भूगोलाची माहिती

पिंपरी - दैनंदिन जीवनात आपल्या मुलांना किल्ल्यावर फिरायला घेऊन जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि भूगोलाची माहिती व्हावी, यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभाग आणि गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने महिन्यातून एकदा गडकिल्ल्यावर नेण्याचा उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. 

सध्याच्या काळात मोबाईलवरील गेम आणि टीव्हीवरील कार्टून पाहण्यातच वेळ जात असल्याने मैदानी आणि मर्दानी खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच बहुतांश पालकही आपल्या मुलांना थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी फिरायला नेतात. यामुळे मुलांना इतिहास आणि भूगोल याबाबत प्रत्यक्ष स्थळावर जाऊन ज्ञान मिळणे दुरापास्त झाले आहे. पहाटेपासून अविरतपणे कष्टाचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल्या मुलांना घेऊन गडकिल्ल्यावर जाण्यासाठी वेळ कधी मिळणार आणि जरी वेळ मिळालाच तरी गडकिल्ल्याचा इतिहास आणि भौगोलिक महत्त्व कोण सांगणार?

अशी झाली उपक्रमाची मुहूर्तमेढ
दिवाळीमध्ये शिरगाव येथे एक एकर जागेत रघुराज एरंडे, मनोज काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजगडाची प्रतिकृती तयार केली. चिंचवडमधील वृत्तपत्र विक्रेते किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी काकडे आणि एरंडे यांनी किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व सांगितले. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेत्याच्या मागणीनुसार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना किल्ल्यावर प्रत्यक्ष नेऊन माहिती देण्याचा उपकम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या उपक्रमास गणेश जाधव आणि विठ्ठल सस्ते या विक्रेत्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

या किल्ल्यांची दिली माहिती
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ आणि गडकिल्ले सेवा समितीच्या माध्यामातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना कोरीगड, धनगड (दोन्ही मुळशी तालुका), तिकोणागड (ता. मावळ) आणि रोहिडागड (ता. भोर) हे गडकिल्ले दाखविण्यात आले आहेत. तसेच २६ जानेवारी रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रंबकेश्‍वरजवळील हरिहरगडावर नेऊन माहिती देण्यात आली.

काय माहिती दिली जाते?
गडकिल्ल्यावर गेल्यावर बुरूज आणि फांजी म्हणजे काय, दरवाजा आणि किल्ल्याची युद्ध शास्त्रानुसार बांधणी, किल्ला बांधण्यासाठी दगड आणि पाणी कोठून आणतात, ही सर्व माहिती प्रत्यक्ष स्थळावर नेऊन दिली जाते. याशिवाय वेळोवेळी तज्ज्ञ व्यक्‍तीकडूनही मुलांना माहिती दिली जाते. याशिवाय आसपासच्या परिसरातील पक्षी आणि प्राण्यांची माहिती दिली जाते. तसेच गिर्यारोहणासाठी लागणारे साहित्य आणि प्रत्यक्ष सरावही करून घेतला जातो. मुलांना आवड निर्माण व्हावी, यासाठी सुरवातीला छोटे-छोटे किल्ले दाखविण्यात येणार असून राजगड, रायगड, शिवनेरी हे किल्ले नंतर दाखविण्यात येणार असल्याचे काकडे आणि एरंडे यांनी सांगितले.

शाळेतील पुस्तकात शिकलेला इतिहास प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन शिकण्यात एक वेगळीच मजा आहे. यामुळे इतिहास आणि भूगोलाची माहिती मिळतेच; शिवाय सहलीसारखाही आनंद मिळतो.
 - वैष्णवी सुनील सुरवसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com