कचरा व्यवस्थापनावर सोसायट्यांचा भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाबाबत केंद्र सरकारकडून करण्यात आलेली जनजागृती, महापालिकेकडून होणारी प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना पटलेले स्वच्छतेचे महत्त्व, यातून शहरामध्ये स्वच्छतेचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसांत शहरातील हाउसिंग सोसायट्यांनीही स्वच्छतेचा पुरस्कार करत कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यास सुरवात केली आहे.

पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाबाबत केंद्र सरकारकडून करण्यात आलेली जनजागृती, महापालिकेकडून होणारी प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना पटलेले स्वच्छतेचे महत्त्व, यातून शहरामध्ये स्वच्छतेचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसांत शहरातील हाउसिंग सोसायट्यांनीही स्वच्छतेचा पुरस्कार करत कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यास सुरवात केली आहे.

रोझलॅंडचा पुढाकार
‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या तत्त्वावर पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड सोसायटीने रविवारपासून आपल्याकडील सर्व (शंभर टक्के) ओला कचरा सोसायटीअंतर्गत जिरविण्यास सुरवात केली. त्याव्यतिरिक्तही प्लॅस्टिक, इलेक्‍ट्रॉनिक आणि काच अशा कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे प्रत्यक्षात दहा टक्केच कचरा सोसायटीबाहेर जाईल, असे प्रयोजनही सोसायटीने केले आहे. 

अन्य सोसायट्याही तयार
रोझलॅंड सोसायटीप्रमाणे शहरातील बहुतांश सोसायट्यांनीही कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास ५० सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रोझलॅंड सोसायटीला भेट देऊन कचरा वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

केंद्रीय सचिवांची शिफारस
दिल्ली येथील लेखिका उर्वशी दमानिया यांनीही रोझलॅंडच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कचरा व्यवस्थापनाची माहिती घेतली. स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय सचिव व्ही. के. जिंदाल यांनीच रोझलॅंडची शिफारस केल्याचे दमानिया यांनी सांगितले. रोझलॅंडने राबविलेले हे मॉडेल संपूर्ण देशभरात राबविणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी पदाधिकाऱ्यांजवळ व्यक्त केले. 

अंजली भागवत यांच्याकडून पाहणी
महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ असलेल्या अंजली भागवत रहिवासी असलेल्या वाकड येथील सोसायटीनेदेखील कचरा व्यवस्थापनासंदर्भात रोझलॅंडचे मार्गदर्शन घेतले. तसेच लवकरात लवकर सोसायटीतील ओला कचरा जिरविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले.

रोझलॅंडची दखल
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी रोझलॅंडचे मार्गदर्शन घेतले व त्या प्रकारचा प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले. 

कस्टम ड्यूटी एक्‍साइज या शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीदेखील रोझलॅंडच्या उपक्रमाची माहिती घेतली.

पुण्यातील गांधी भवन रोटरी क्‍लबतर्फे कोथरूडमधील १५-१६ सोसायट्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

कल्याणीनगर येथील १०-१५ सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली रोझलॅंडमधील उपक्रमाची पाहणी.

दर शनिवार- रविवारी पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी रोझलॅंडला भेट.

Web Title: marathi news garbage management societies PCMC