गुजरात निवडणूक : काँग्रेस उमेदवार छाननीची धुरा बाळासाहेब थोरातांवर

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांवर मागील निवडणुकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काँग्रेस उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री, संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
गुजरातसह विविध राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार्‍या आहेत. गुजरातची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असून काँग्रेसच्या केंद्रीय समितीने गुजरात विधानसभा काँग्रेस उमेदवार छाननी समितीच्या अध्यक्षपदी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. 

आमदार थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते युवक यांच्याबरोबर थेट संबध आणि राज्याच्या विविध भागातील प्रश्‍नांचा अभ्यास, यामुळे त्यांचे नेतृत्व लोकप्रिय ठरले आहेत. राज्यमंत्रीमंडळात कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमीन, जलसंधारण, रोहियो, राजशिष्टाचार व महसूल या विभागामधून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांवर मागील निवडणुकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले.

काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठता, सेवाभावीवृत्ती, कामाची तत्परता, लोकाभिमूखता व सामान्य नागरिकांबरोबर थेट संवाद यामुळे येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील गुजरातच्या विधानसभा निवडणूकीची महत्वाची जबाबदारी आमदार थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे.

Web Title: marathi news gujarat elections congress candidates balasaheb thorat