"हिमोग्लोबिन' तपासता येणार घरच्या घरी! 

"हिमोग्लोबिन' तपासता येणार घरच्या घरी! 

पुणे - शरीरातील हिमोग्लोबिन तपासायचे असेल, तर त्यासाठी रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. परंतु तेच घरच्या घरी तपासता आले तर?... "एचबी' तपासणीची ही प्रक्रिया घरीच करण्याचे तंत्र पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने विकसित केले आहे. आपल्याजवळील कोणताही स्मार्टफोन त्यासाठी मदत करणार आहे. 

हिमोग्लोबिनचे प्रमाण महिलांमध्ये कमी आढळते. विशेषत: ग्रामीण भागात ही समस्या भेडसावते. त्याची तपासणी करण्याची अत्याधुनिक यंत्रणादेखील सहजी उपलब्ध नसते. याचा विचार करून "आघारकर'मध्ये त्यावर संशोधन करण्यात आले. संशोधक विद्यार्थी नीरज घाटपांडे आणि शास्त्रज्ञ प्रसाद कुलकर्णी हे या प्रकल्पावर काम करीत होते. तीन वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांना त्यात यश मिळाले आहे. 

असे झाले संशोधन 
शाळकरी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे तीनशे नमुने गोळा करून त्यातील हिमोग्लोबिन प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. किमान सात ते 16 ग्रॅम/डीएल हिमोग्लोबिन असलेल्या नमुन्यांची क्रमवारी करण्यात आली. या प्रक्रियेत एक सूत्र संशोधकांना सापडले. कोणत्याही रंगात लाल, हिरवा आणि निळा रंग असतो. हिमोग्लोबिनच्या चढउतारामध्ये या प्रत्येक रंगाच्या तीव्रतेत पडणारा फरक तपासण्यात आला. पण हिरव्या रंगातील बदल हे हिमोग्लोबिन मोजण्यासाठी अधिक उपयोगी ठरले. त्यानुसार संशोधकांनी रक्ताच्या तीनशे नमुन्यांचे गणिती सूत्र तयार केले. 

गणिती सूत्र झाले; पण हिमोग्लोबिनचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा, यावर विचार सुरू झाला. पुण्यातील "माइंडब्राउझर' या कंपनीने त्यांना गणिती सूत्राच्या आधारे "मोबाइल ऍप' मोफत बनवून दिला. त्यावर तपासणीच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यातून प्रयोगशाळेतील निष्कर्षाच्या अचूकतेपर्यंत पोचल्याचे समोर आले आहे. यावर अधिक संशोधन सुरू असल्याचे आघारकर संशोधन संस्थेने स्पष्ट केले आहे. हे संशोधन "रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री'च्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्येही प्रसिद्ध झाले आहे. 

तपासण्याची पद्धत 
रक्ताचा नमुना घेऊन एका "वेलप्लेट' (प्लॅस्टिकची खोलगट डबी) तो "हिमोकोर' या "रिएजंट'मध्ये मिसळला जातो. त्या शेजारी दुसऱ्या "वेल'मध्ये "हिमोकोर' घेतले जाते. मोबाइलमधील ऍपवर दोन्ही द्रवाचे छायाचित्र काढले जाते. तो ऍप दोन्ही छायाचित्रांची गणिती सूत्रांशी पडताळणी करून पाहतो आणि काही सेकंदात शरीरातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची माहिती स्क्रीनवर दाखवतो. अगदी सोप्या पद्धतीने घरी देखील करता येईल, अशी ही पद्धत आहे. या संशोधनाचे पेटंट मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याचे कॉपीराइट मिळवून नंतर ते किट बाजारात येईल. त्या वेळी त्याची कमाल किंमत ही 25 रुपये एवढी कमी असेल. 

खेड्यांतील नागरिकांची हिमोग्लोबीन तपासणीसाठी याचा खूप उपयोग होऊ शकेल. कारण तेथे तपासणीची यंत्रणा नसते. त्यांचे रक्त घेऊन शहरी भागात तपासणीसाठी आणताना ते खराब होण्याचाही धोका असतो. परंतु "आघारकर'ने विकसित केलेल्या तंत्रामुळे गावातच हिमोग्लोबिन मोजण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. 
- प्रसाद कुलकर्णी (शास्त्रज्ञ, आघारकर संशोधन संस्था) 

हिमोग्लोबिन तपासण्यासाठी कोणत्याही स्मार्टफोनचा वापर होणार असल्याने त्यावर प्रत्येकाच्या नावाने रिपोर्टदेखील तयार करता येईल. या शिवाय हिमोग्लोबिनसाठी घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याद्वारे रक्ताच्या अन्य काही चाचणी करता येतील का, यावरही संशोधन सुरू आहे. 
- नीरज घाटपांडे (संशोधक विद्यार्थी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com