कल्पना व वास्तवादरम्यानचा पूल ठरलेली कविता

नीला शर्मा
गुरुवार, 8 मार्च 2018

सभोवतालचं धगधगतं वास्तव कवितेतून सांगणाऱ्या कल्पना दुधाळ यांची कविता भल्याभल्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. शेती-मातीची बोली बोलणारी त्यांची कविता ही कल्पना व वास्तवादरम्यान मजबूत पूल होऊन राहिली आहे. 

 ना सांगून संपेल,  ना ऐकून संपेल,  ना वाचून संपेल
 अशी न संपणारी  गोष्ट आहोत आपण

असं स्वतःच्या रूपकातून एकूण स्त्री विश्‍वाचं मर्म सांगणारी कल्पना दुधाळ यांची कविता वरवर सोपी वाटली तरी तिची पाळंमुळं खोलवर रुतलेली आहेत. त्या म्हणाल्या, ‘सभोवतालच्या धगधगीत वास्तवाबाबत दुसरं काही नाही करता आलं तरी मी कवितांमधून ते व्यक्त करते आहे, ही जाणीव मला ताकद देऊन गेली. शेतीत राबणाऱ्या माणसांचे, विशेष करून स्त्रीचे अनुभव माझ्या कवितेत उतरू लागले.’

टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) गावातली ही कन्या अभ्यासात हुशार म्हणून बारावीनंतर चुलत्यांनी पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आणल्याने संधीचं सोनं करू लागली. महाविद्यालयातल्या वाचनालयानं तिला साहित्य, साहित्याचे प्रकार आणि साहित्यिकांच्या कार्याचं नवंच विश्‍व खुलं करून दिलं. कल्पनाताईंनी सांगितलं की, आधीची शेतीत राबणारी मी, पदवी मिळविल्यामुळे, ‘आता आपण कुणी वेगळेच आहोत,’ अशा भावनांमध्ये सुरवातीला गुरफटले. पदवीनंतर लग्न होऊन सासरी आले. दौंड तालुक्‍यातल्या बोरीभडक गावी पुन्हा शेतीतली कामं करताना वाटणारी अस्वस्थता कवितेतून बाहेर पडू लागली. या कवितेनंच मला शांत केलं. माझ्यातल्या या सुप्त शक्तीचं भान आलं तसतशी मी माझ्याच कवितेकडे बारकाईनं पाहू लागले. ‘सीझर कर म्हणतेय माती’ या माझ्या पहिल्या कवितासंग्रहातल्या कविता जाणकारांना वेगळ्या वाटल्या असल्या तरी मी माझ्याच ओळींना जोखू, पारखू लागले. त्यातनं थोड्या परिपक्वतेकडे गेलेल्या कविता ‘धग असतेच आसपास’मध्ये आल्या. त्यांच्यात वास्तव व नातेसंबंधांमधले बदल मांडताना माझी आतल्या आत खूप घुसळण झाली. उण्यापुऱ्या दहा वर्षांची या कवितेची उमर असली तरी साहित्य अकादमी पुरस्कारानं तिला गौरवलं गेलं. महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक संस्थांकडून मानसन्मान मिळालेल्या कल्पनाताईंच्या कविता बोलक्‍या आहेत, सशक्त आहेत. शतकानुशतकांचं संचित मोजक्‍या व थेट शब्दांत मांडणाऱ्या आहेत. कल्पना व वास्तवादरम्यानचा पूल ठरणाऱ्या आपल्या कवितेला कल्पनाताई सतत प्रश्‍न विचारून जागं करत असतात. 

शेतावर जाताना, जोडधंदा असलेल्या शेडमध्ये जाताना कल्पनाताईंच्या पिशवीत सतत एक वही असते. कविता सुचली आणि वेळ मिळाला तर ती वहीत लिहिली जाते. मात्र आपल्या एकटीच्याच नव्हे तर सभोवतालच्या कितीतरी लोकांच्या जीवनाचं महाकाव्य, संघर्षगाथा लिहिण्यासाठी कवितेचं संवेदनशील माध्यम त्यांना गवसलं आणि त्यांनी ते विचारपूर्वक उपयोगात आणलं ही नव्या परिवर्तनाची नांदीच म्हणायला हवी.

Web Title: marathi news International Womens Day kalpana dudhal