चोवीस तास ‘ऑन ड्यूटी’ करणाऱ्या महिला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नोकरी चोखपणे बजावण्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी महिला उत्कृष्टपणे पेलत आहेत. २४ तास ‘ऑन ड्यूटी’ असूनही स्वतःसाठी वेळ द्यायला त्या विसरत नाहीत. अशाच काही महिला-तरुणींशी महिला दिनानिमित्त साधलेला संवाद.

तृप्ती चौगुले, डॉक्‍टर ः
 वैद्यकीय व्यवसायात कामाची वेळ ठरलेली नसते. आपत्कालीन दूरध्वनी आला की, कामावर जावेच लागते. अशावेळी आपली जबाबदारी ओळखून आणि कर्तव्यदक्ष राहून चोखपणे भूमिका बजवावी लागते. कधी-कधी सण-उत्सवही कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही. व्यवसायाशी असलेली बांधीलकी महत्त्वाची वाटत असल्याने मला त्याचे दुःखही वाटत नाही. वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक जणींनी स्वतःला सिद्ध केले आहे. या क्षेत्रातील वेळ ठरलेली नसली तरी त्या स्वतःसाठी वेळ काढतातच. मीही काढते. शेवटी कर्तव्य आणि कुटुंब दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही वेगळ्या रीतीने पेलायला शिकले पाहिजे.

पूनम देशपांडे, सॉफ्टवेअर इंजिनिअर ः
 आमच्या व्यवसायात तर कामाची वेळ ठरलेलीच नाही. अगदी वीकेंड्‌सलाही कामावर जावे लागते. यामुळे कधी-कधी ताणतणावही जाणवतो; पण कामाच्या वेळेत कुटुंब आणि कुटुंबाच्या वेळेत काम आणू नये. हा समतोल साधता आला तर प्रत्येक ताण दूर होतो. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अनेक महिला-तरुणी काम करतात. त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही; परंतु त्या कामात आनंद मिळवत असल्याने त्यांना ताण जाणवत नाही. आठवड्यात एक दिवस न चुकता कुटुंबासाठी काढते. त्याशिवाय दररोज स्वतःचा छंद जोपासण्यासाठी वेळ देतेच. प्रत्येकाने 
हे केले पाहिजे.

अंजली दिवाकर, शिक्षिका ः 
निवडणुका किंवा परीक्षा या दरम्यान शिक्षकांसाठी नोकरीची वेळ निश्‍चित नसतेच. निवडणूक काळात तर कधी-कधी दिवसरात्र काम करावे लागते. रोज १२ तास काम होतेच; परंतु मुलांचे भवितव्य आमच्या हाती असल्यामुळे सर्वप्रथम कामाला प्राधान्य द्यावे लागले. आतापर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्यांना शिकवतानाचा अनुभव खूप वेगळा आणि सुखावणारा आहे. आज विविध क्षेत्रांत महिला काम करत आहेत. आत्मविश्‍वासाच्या जोरावरच त्यांनी ते यश मिळविले, हे आपण विसरून चालणार नाही. शिक्षण क्षेत्रात आजही मोठे बदल होत असून, ते स्वीकारूनच या क्षेत्रातही महिला पुढे जात आहेत.

Web Title: marathi news International Womens Day women