भूकंपाच्या दहशतीने आदिवासी घराबाहेर

Earthquake-jawhar
Earthquake-jawhar

मोखाडा : मागील आठवड्यापासुन जव्हार तालुक्यात भूकंपाचे हादरे बसत आहेत. 25 डिसेंबरला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने जव्हार तालुक्यातील वाळवंडा ग्रामपंचायती मधील अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे येथील आदिवासी भयभीत झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून येथील आदिवासी घरदार सोडून ऐन थंडीत घराबाहेर आणि शेतावर वास्तव्यास गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण गांव, शाळा आणि अंगणवाड्या भूकंपाच्या दहशतीने ओस पडल्या आहेत. 

जव्हार शहरासह लगतच्या गाव-पाडयांना चार वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालीमुळे जमिनीला हादरे बसण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात जव्हारसह वाळवंडा लगतच्या गाव-पाडयांना भूकंपाचे हादरे बसले होते. तर 25 डिसेंबरला तीव्र भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्याची तीव्रता मागील धक्क्यांपेक्षा अधिक होती. त्यामुळे वाळवंडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पाडे हादरले असून तेथील अनेक घरांना तडे गेले आहेत. वाळवंडा ग्रामपंचायत हद्दीत 6 पाडे असून 514 घरे आहेत. तर सुमारे 2321 लोकसंख्या आहे. या घटनेमुळे येथील आदिवासी भयभीत झाले आहेत. त्यांनी आपले घरदार सोडून जीव वाचविण्यासाठी, माळरानावरच्या शेताचा आसरा घेतला आहे. तर काही ग्रामस्थ रात्री ऐन थंडीत घराबाहेर अंगणात जागरूकपणे झोप घेत आहेत. भूकंपाची दहशत मनात बसल्याने आदिवासींनी गाव सोडले आहे, त्यामुळे संपूर्ण गांव ओस पडले आहे. या दहशतीमुळे शाळा अंगणवाड्या ही ओस पडल्या आहेत. 

विशेष म्हणजे या गावात प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ रोजगारासाठी स्थलांतर करत नाही. गावातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विध्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के असते. मात्र, भूकंपाच्या दहशतीने नागरिकांनी गाव सोडल्याने अंगणवाडी आणि शाळाही ओस पडल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जव्हारचे बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी तातडीने वाळवंडा गावाला भेट देऊन तेथील अंगणवाडीची पाहणी केली आहे. यावेळी संपूर्ण वाळवंडा गाव ओस पडल्याचे आढळले असून अंगणवाडीच्या इमारतीला देखील तडे पडल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. 

भूकंपाच्या धक्क्याचा आढावा घेण्यासाठी, घटनेच्या दुसर्‍या दिवशी तेथील ग्रामसेवक व्ही. बी. भोरे यांच्यासह तलाठी व पोलीस उपनिरीक्षक यांनी वाळवंडा गावाला भेट दिली आहे. येथील वाळवंडा, सडकपाडा आणि ऊंबरवांगन येथे भूकंपाचे हादरे मोठ्या प्रमाणात बसल्याचे आढळले असून फणसाचा, खंडीपाडा आणि खडकीपाडा यांना थोड्याफार प्रमाणात हादरे बसले आहेत. तर 38 घरांच्या भिंतींना तडे गेले असून, नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर झोपण्यास सांगितल्याची माहीती ग्रामसेवक भोरे यांनी दिली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com