बेकायदा जाहिरातींवर बारामतीत कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

ज्या संस्थेची ही पत्रके आहेत किंवा ज्यांचे मोबाईल क्रमांक या पत्रकांवर टाकलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध बारामती नगरपालिकेने विद्रूपीकरण कायद्यान्वये कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बारामती : शहरात असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायाच्या बेकायदा जाहिराती चिटकवून शहर विद्रूपीकरणाचे काम सुरू असताना नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील मोक्‍याच्या जागेच्या भिंती, पथदिव्यांचे खांब, उद्योग भवनांचे खांब इतकेच नाही, तर निवासी संकुलामध्येही बिनधास्त घुसून अशा जाहिराती चिटकवून विद्रूपीकरणाचे काम सध्या सर्रास होते आहे. 

याबाबत मधल्या काळात नगरपालिकेने अशा पत्रकबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा फक्त इशाराच दिला, प्रत्यक्षात पुढे काहीच झाले नाही. बारामती शहरात सातत्याने अनेक ठिकाणी विविध क्‍लासेसपासून ते हुरड्यापर्यंत अनेक व्यवसायांच्या जाहिरातींची पत्रके एका रात्रीत आणून चिटकविण्याचा व्यवसायच काहींनी हाती घेतला आहे. ही पत्रके चिटकविताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच ती चिटकवली जातात. 

ज्या संस्थेची ही पत्रके आहेत किंवा ज्यांचे मोबाईल क्रमांक या पत्रकांवर टाकलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध बारामती नगरपालिकेने विद्रूपीकरण कायद्यान्वये कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी केलेल्या भिंतींसह पथदिव्यांच्या खांबांवरही अशी पत्रकबाजी केली जाते, यामुळे शहराचे सौंदर्य खराब होत असल्याने ज्यांच्या व्यवसायाची जाहिरात आहे, अशा व्यावसायिकांवर नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 

Web Title: marathi news local news action should take on illegal hording demanded baramati news