वटवाघुळांचा रात्रीच्या वेळी द्राक्षांवर डल्ला

राजकुमार थोरात
रविवार, 31 डिसेंबर 2017

देशामध्ये १२३ जातीचे वटवाघूळ आहेत. यातील केवळ दोन जातीचे वटवाघूळ द्राक्ष, बोरे व इतर फळे खात असतात. रात्रीच्या वेळी वटवाघूळ या जमिनीला समांतर प्रवास करीत असल्याने शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांना आड्या साड्या, नेट बांधल्यास वटवाघूळ बागेमध्ये घुसणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना बागेमध्ये वटवाघळांना रोखण्यासाठी फिश नेट वापर न करण्याचे आवाहन केले आहे.

(डॉ.महेश गायकवाड, वटवाघूळ व पर्यावरण अभ्यासक)

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वटवाघूळ पक्षी रात्रीच्यावेळी द्राक्षबागेतील द्राक्षे फस्त करीत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चितांग्रस्त झाले आहेत. चालू वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाउस सुरु असल्यामुळे द्राक्ष बागा अनेक रोगांना बळी पडल्या असून, डाऊणी, बुरशीच्या प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रोगांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांची औषधांची फवारणी करावी लागत आहे .नोेव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरींचाही फटका शेतकऱ्यांना जोरदार बसला.

अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांचे मणी फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागतील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, बिरंगुडी परिसरामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वटवाघूळ पक्षांचा त्रास सहन करावा लागत आहे. वटवाघूूळ पक्षी हे रात्रीच्यावेळी द्राक्ष बागेमध्ये येत असून, परिपक्व झालेले द्राक्षांचे मणी खात आहेत. याचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसला असून, हाता-तोंडाशी आलेला घास वटवाघूळ पक्षी हिरावून घेत आहेत.

वटवाघूळ पक्षांना हाकलण्यासाठी शेतकरी कडाक्याच्या थंडी शेतामध्ये वीजेचा उजेड करुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

Web Title: marathi news local news walchandnagar news farmers tension