तलाठी कार्यालय धुळखात ; 3 वर्षांपासून कुलूप बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

''कदाचित वानवडी तलाठी कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसावी. तसेच काही काळ तलाठी तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असतात. मात्र, याबाबतची पूर्ण माहिती घेऊनच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल" (तहसीलदार गीता दळवी )

हडपसर : वानवडी येथील तलाठी कार्यालय गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. तलाठी भाउसाहेब एकदाही या कार्यालयात फिरकलेले नाहीत. तहसील कार्यालयात दस्तावेज संगणकीकृत करण्यात येत असल्याने यात तलाठी व्यस्त असल्याची माहिती तलाठी कार्यालयाबाहेर लावली आहे. परिणामी विविध दाखले घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

या सर्वांमुळे वेळ, पैसा वाया जात असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दमझाक होणा-या व आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठ दिवसांत कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकारने तलाठी नियुक्त केले आहेत. नागरिकांना रहिवाशी दाखले व उत्पन्नाचे दाखले आणि सातबारा देणे व शिधापत्रिका देणे, फेरफार नोंदी करणे, जमीन महसूल गोळा करणे, वारसा प्रकरणांच्या नोंदी करणे, यांसारखी महत्वाची कामे या कार्यालयातून केली जातात.

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून वानवडी येथील कार्यालय कुलूप बंद आहे. नागरिकांना माहिती देण्यासाठीदेखील येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हेलपाटे मारणे व विविध दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी म्हणून ओळखला जाणारा तलाठी गायब असल्याने नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

नागरिक दिनेश सामल म्हणाले, ''मागील तीन वर्षे तलाठी कार्यालय बंद आहे. याच कार्यालयात घोरपडी व वानवडी या दोन गावांची कार्यालये आहेत. विविध दाखले घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे गैरसोय होते. आठ दिवसात तलाठी कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल''. 

याबाबत तलाठी सिमा शेळके म्हणाल्या, "तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असल्याने या कामात मी व्यस्त आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी तहसील कार्यालयात कार्यरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दस्तएेवज संगणकीकृत करण्यासाठीचे दिलेले काम पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर मी वानवडी तलाठी कार्यालयात हजर राहिन". 

''कदाचित वानवडी तलाठी कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसावी. तसेच काही काळ तलाठी तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असतात. मात्र, याबाबतची पूर्ण माहिती घेऊनच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल", असे आश्वासन तहसीलदार गीता दळवी यांनी दिले.

Web Title: marathi news local pune news talathi office locked from three years