‘सहारा-ॲम्बी व्हॅली’साठी ६७ गावे उभारणार लढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

लोणावळा - सहाराचा पंचतारांकित व स्वप्ननगरी असा लौकिक असणारी ‘अँम्बी व्हॅली सिटी वाचविण्यासाठी मुळशी धरण परिसरातील ६७ गावांतील भूमिपुत्र लढा उभारत आहेत. स्थानिक पुत्रांना न्याय देत बुडालेला रोजगार वाचविण्यासाठी सोळा ग्रामपंचायतींच्या वतीने ठराव करण्यात येणार असून, ॲम्बी व्हॅलीप्रकरणी लक्ष घालण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. 

लोणावळा - सहाराचा पंचतारांकित व स्वप्ननगरी असा लौकिक असणारी ‘अँम्बी व्हॅली सिटी वाचविण्यासाठी मुळशी धरण परिसरातील ६७ गावांतील भूमिपुत्र लढा उभारत आहेत. स्थानिक पुत्रांना न्याय देत बुडालेला रोजगार वाचविण्यासाठी सोळा ग्रामपंचायतींच्या वतीने ठराव करण्यात येणार असून, ॲम्बी व्हॅलीप्रकरणी लक्ष घालण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. 

‘सहारा ॲम्बी व्हॅली सिटी’ प्रकल्प अवसायनात निघाल्याने न्यायालयाच्या वतीने लिक्विडेटर नियुक्त करण्यात आला आहे. स्थानिकांसह हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. 

सहारा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने मुळशी धरण परिसरातील अनेक गावांचा रोजगार बुडाल्याने स्थानिक भूमिपुत्र बेसहारा झाले आहेत. न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ॲम्बी व्हॅलीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांपुढे एक आशेचा किरण जागा झाला आहे. मात्र, अद्याप खरेदीदार मिळत नसल्याने कामावर असलेल्या, तसेच काढून टाकलेल्या कर्मचारी, विविध कत्राटदारांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

एकत्रित लढा उभारणार
सहारामुळे एकेकाळी आलेले वैभव परत मिळविण्यासाठी सोळा ग्रामपंचायतींसह ६७ गावांचा एकत्रित लढा उभारण्यात येणार आहे. ॲम्बी व्हॅलीच्या प्रभावक्षेत्रातील सोळा ग्रामपंचायतींचे सरपंच, राजकीय- सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची रविवारी (ता. ११) लोणावळ्यातील चंद्रलोक हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. या वेळी मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदा आखाडे, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या कोमल वाशिवले, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूशेठ वाळंज, दत्तात्रेय सुर्वे, महिला सरपंच अर्चना वाघ, दीपाली कोकरे, वंदना दाभाडे, सुवर्णा कदम, सरपंच मच्छिंद्र कराळे, श्रीराम वायकर, समीर सातपुते, रामचंद्र खळदे, अंकुश वाशिवले, कामगार नेते सुनील हुंडारे, प्रकाश राऊत, प्रकाश मानकर आदींसह विविध गावांतील पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. कायद्याचा अवमान न होता न्यायालयीन लढा उभा करण्याबरोबर राजाश्रय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. जनहित याचिकेद्वारे दाद मागण्याचा निर्णय मुळशी धरणक्षेत्रातील सोळा ग्रामपंचायती ग्रामसभांत मांडणार असून, ॲम्बी व्हॅलीप्रकरणी सरकारने मध्यस्ती करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

बैठकीतील प्रमुख मुद्दे
 कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन द्यावे
 स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात
 कामावरून काढून टाकलेल्या स्थानिकांना प्राधान्याने सामावून घ्यावे

Web Title: marathi news lonavala news sahara aamby valley village agitation