शाडूतून गणेशमूर्ती साकारण्याचे 'वर्ल्ड रेकॉर्ड' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : बाप्पाच्या कानातली भिकबाळी, एवढंच काय, उपरणं आणि जानवंही... माझा बाप्पा मी माझ्या मनासारखा घडविला; शाडूची माती घेतली आणि बघता बघता एका तासात विघ्नहर्ता साकारला... या मूर्तीची मी गणेशोत्सवात घरी प्रतिष्ठापना करणार आणि मित्रांनाही पर्यावरणपूरक बाप्पांविषयी सांगणार, असा अनुभव कथन करत होता आठवीत शिकणारा सार्थक पंचपोच. 

पुणे : बाप्पाच्या कानातली भिकबाळी, एवढंच काय, उपरणं आणि जानवंही... माझा बाप्पा मी माझ्या मनासारखा घडविला; शाडूची माती घेतली आणि बघता बघता एका तासात विघ्नहर्ता साकारला... या मूर्तीची मी गणेशोत्सवात घरी प्रतिष्ठापना करणार आणि मित्रांनाही पर्यावरणपूरक बाप्पांविषयी सांगणार, असा अनुभव कथन करत होता आठवीत शिकणारा सार्थक पंचपोच. 

सार्थकसमवेत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेतील पाचवी ते दहावीचे 2161 विद्यार्थी देखील शाडूची मूर्ती तयार करत होते. या विक्रमाची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' या संस्थेने केली आणि शाळेला प्रशस्तिपत्रकही दिले. यासाठी आठ दिवस अगोदर शाळेतील विद्यार्थी तयारीला लागले होते. 2500 किलो शाडूच्या मातीपासून विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती घडविल्या. 

समूहशक्तीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना आविष्कारातून बाप्पाच्या मूर्ती घडविल्या. बाप्पाचे लाडके वाहन अर्थातच मूषक, मयूर रथावर बसलेला बाप्पा, पाश आणि अंकुश धारण केलेला बाप्पा, चौरंग व पाटावर बसलेला बाप्पा, बाप्पासाठी मेघडंबरी यासारख्या अनेकविध कल्पनांना विद्यार्थ्यांनी मूर्त स्वरूप दिले आणि त्याचद्वारे मातीच्याच श्रीगणेशाची मूर्ती घरोघरी स्थापन करून पर्यावरण संवर्धनाचा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश स्वतःच्याच कृतीतून दिला. 'सकाळ फेसबुक लाइव्ह'द्वारेही अनेकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' या संस्थेचे पावन सोलंकी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, सोसायटीच्या आजीव सदस्य सविता केळकर, श्रीकृष्ण कानिटकर, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप कोटीभास्कर, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, उपमुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका रजनी कोलते, अर्चना पंच, शिल्पकार अभिजित धोंडफळे, आनंद सराफ, कलाशिक्षक जयंत टोले, संदीप माळी, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते. 

रथाच्या चार बाजूला मोर केले. मध्ये बाप्पाची मूर्ती बसविली. मुगुटावर चंद्रकोर आणि हिरे लावले. पाश आणि अंकुश तयार केले. बाप्पाच्या मूर्तीसोबत मूषकही केला. घरी याच बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहे. पीओपीची मूर्ती बसवू नका, असे मित्रांनाही सांगणार आहे. 
- निरंजन चौधरी, शाडूतून गणेशमूर्ती साकारणारा विद्यार्थी 

मुलांनी उत्कृष्टरीत्या गणेशमूर्ती बनविल्या. शाळेने हा उपक्रम हाती घेतल्याने, 'इको फ्रेंडली' गणपतींची कार्यशाळा मला घेता आली. या उपक्रमाबद्दल शाळेचे अभिनंदन करतो. 
- अभिजित धोंडफळे, शिल्पकार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 'मन की बात'मधून शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. पालकांनीही आर्थिक मदत केली. शाळा-शाळांमधून हा उपक्रम व्यापक प्रमाणत झाला, तर घरोघरी शाडूच्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना होईल आणि जलप्रदूषणही टळेल. 
- तिलोत्तमा रेड्डी, मुख्याध्यापिका, रमणबाग प्रशाला

Web Title: marathi news marathi website Ganeshotsav Ganpati Utsav