हिंजवडीची कोंडी सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय

File photo
File photo

पिंपरी : 'सकाळ'ने लावून धरलेल्या हिंजवडी वाहतूक समस्येवर आता पीएमआरडीए, पोलिस, एमआयडीसीसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वेगाने पावलेही उचलली आहेत. 'सकाळ'ने प्रकाशझोत टाकलेल्या माण-पिरंगुट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, नांदे-चांदे रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या व्यतिरिक्तही बैठका आणि चर्चाही सुरू आहेत. 

यंत्रणांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हिंजवडी आयटी क्षेत्र सुखावले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांची प्रतीक्षा संपणार असल्याची प्रबळ भावना त्यांच्यात जागृत झाली आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव त्यांना झाल्याचे बोलले जात आहे. 

'फ्री अप हिंजवडी'चे समन्वयक सुधीर देशमुख, करमचंद गर्ग आणि सुदेश राजे यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले आहे. राजे म्हणाले, ''गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी हिंजवडी प्रश्‍नांबाबत सर्वसमावेशक बैठक घेतली. 'सकाळ'मधील वृत्तमालिकेचे दखल घेऊन त्यांनी 'फ्री अप हिंजवडी'च्या समन्वयकांशी पुन्हा चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार, लवकरच बैठकीचे नियोजन केले जाईल. त्यामध्ये समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्‍यक मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडू.'' 

पीएमआरडीएकडून सर्वेक्षण 
पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले येथील रस्ते वापरासाठी सुकर करावेत, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. 

वाहतूक अहवाल करणार 
वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सार्वजनिक बैठक घेऊन वाहतूक समस्येबाबत सखोल चर्चा केली. या बैठकीत स्थानिक व्यापारी संघटनांपासून, सोसायटी फेडरेशन आणि अन्य नागरिकही सहभागी झाले होते. त्यामध्ये वाकड-हिंजवडीतील वाहतूक कोंडीप्रवण क्षेत्र निश्‍चित केले आहे.

हिंजवडीतील वाहतुकीचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, बैठकीत चर्चिल्या गेलेल्या मुद्यांचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो वाहतूक विभागाला देण्यात येणार असल्याचेही घोळवे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com