पिंपरी शहर काँग्रेसची लवकरच पुनर्रचना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

शहर काँग्रेसमधील निष्क्रिय बूथ अध्यक्ष बदलण्यात येतील. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण होईल. सक्षम, नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. 
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कार्यकारिणीतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची लवकरच सुटी होणार आहे. येत्या दीड महिन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना केवळ पदे मिरविणाऱ्यांना घरी बसविले जाईल. महापालिका निवडणुकीनंतर सुस्तावलेल्या कार्यकारिणीला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हे बदल होणार आहेत. 

राष्ट्रीय स्तरावर पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवड व नियुक्‍त्यांची प्रक्रिया केली जाते. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार सर्व राजकीय पक्षांसाठी ती बंधनकारक असते. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावर बदलाचे वारे सुरू आहेत. त्यासाठी पक्षाने प्रत्येक वरिष्ठ नेत्याकडे प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. पुणे जिल्ह्यासाठी पक्षाने बिहारच्या ज्येष्ठ नेत्या भवानीजी झा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड शहराला भेट देऊन शहर कार्यकारिणीचा आढावा घेतला. या संदर्भात शहर कार्यकारिणीच्या सातत्याने बैठका सुरू असून नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. 

शहरात तीन ब्लॉक अध्यक्ष असून 650 बूथ अध्यक्ष आहेत. पूर्वी अनेक नियुक्‍त्या तोंडदेखल्या झालेल्या आहेत. त्याचाच परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला. एकही नगरसेवक निवडून न येण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. याची गंभीर दखल केंद्रीय कार्यकारिणीने घेतली आहे. जेथे बूथ अध्यक्ष निष्क्रिय आहेत, त्यांना लगेच घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. त्यांच्याजागी नवीन, होतकरू आणि सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. पुनर्रचनेसंदर्भात जवळपास 60 ते 70 टक्के नियोजन पूर्ण झाले असून उर्वरित बूथ समित्यांची तपासणी केली जाणार आहे. येत्या एक ते दीड महिन्यात हे बदल पूर्ण केले जातील, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

महापालिका निवडणुकीच्या अगोदर तीनही ब्लॉक अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. पिंपरी विधानसभा विभागासाठी बाळासाहेब साळुंके, चिंचवडसाठी परशुराम गुंजाळ; तर भोसरीसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत नेवाळे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आताचे बदल हे बूथ स्तरापर्यंत सीमित राहण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news marathi website Pimpri news pune news congress