चूक 'महावितरण'ची अन्‌ शिक्षा ग्राहकांना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

'स्टॅंडर्ड ऑफ परफॉर्मन्स'च्या निकषांनुसार ग्राहकांना नुकसानभरपाई मिळू शकते. यासंबंधीचा कायदा 2005मध्ये झाला. ज्या एजन्सींमुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. त्यांना त्या एजन्सींच्या कमिशनमधून भरपाई द्यावी. केवळ अंतर्गत तक्रार निवारण कक्ष ते लोकपालांपर्यंत एखादीच व्यक्ती जाते. अन्य ग्राहकांचे काय? त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच 

पुणे : वीजबिलांची छपाई करताना एखाद्या ग्राहकाला नेहमीपेक्षा दुप्पट बिल जाते... काही चुकून लाखो रुपयांचीही बिले दिली जातात... ही बाब संबंधित ग्राहकांकडून महावितरणच्या निदर्शनास आणून दिली जाते. त्यावर 'आता आहे ते बिल भरा, पुढच्या बिलामध्ये वळते करून घेऊ,' असे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जाते. एजन्सी आणि महावितरणच्या घोळात ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. 

वीज मीटरचे रीडिंग घेण्यापासून ते बिलवाटपापर्यंतची कामे खासगी एजन्सींकडे दिली आहेत. पुणे परिमंडलअंतर्गत 29 एजन्सींद्वारे हे काम केले जाते. महावितरणचे अधिकारी एजन्सी चालकांच्या बैठक घेतात; परंतु तरीही प्रश्‍न सुटत का नाही, असा प्रश्‍न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. एजन्सी बदलली तरीही तीच माणसे पुन्हा नाव बदलून निविदा भरतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. या भोंगळ कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे. 

पुणे शहरात वाढीव बिलांचे प्रमाण गेल्या तीन-चार महिन्यांत वाढले असून, सामान्यांच्या तक्रारींचे निराकरण होत नाही. मीटर रीडिंग घेणे आणि बिलांचे वाटप करणे, या कामांसाठी यापूर्वी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येत होते; पण आता ही कामे एकाच व्यक्तीने करावीत, असेही सांगण्यात येत आहे. 

एकाच व्यक्तीला मीटरचे रीडिंग घेणे आणि बिले वाटप करणे हे सोईचे होते. कारण, त्या व्यक्तीला संबंधित ठिकाणे माहिती असतात. पूर्वी दोन्ही कामांसाठी वेगळी माणसे नेमली होती; परंतु त्यामध्ये वेळ जात होता. एक व्यक्ती ही दोन्ही कामे करत असताना त्यात काही तफावत आढळली, तर नव्याने निविदा प्रक्रिया काढण्यात येतील. 
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

Web Title: marathi news marathi website Pune News Mahavitaran Electricity Board