जप्त वाहनांचा पुण्यातील कात्रज आगारात डोंगर

Katraj RTO Pune
Katraj RTO Pune

कात्रज : जप्त केलेल्या वाहनांचा पीएमपीच्या कात्रज आगारात डोंगर उभारून प्रादेशिक परिवहन मंडळाने अडगळ निर्माण केली आहे. वाहने हटवण्यासाठी गेली अनेक वर्षे पीएमपी प्रशासनाने आरटीओकडे केलेला पाठपुरावा अपयशी ठरल्यानंतर अखेर पीएमपीनेच जागा शोधून ती वाहने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, डास उत्पत्तीचे केंद्र ठरू पाहणारा वाहनांचा डोंगर त्वरित हटवावा, अशी मागणी होत आहे. 

कात्रज आगार सुरू झाला तेव्हा सत्तर बस होत्या. आज रोजी या आगारातील बसची संख्या तिप्पट झाली आहे. आगारासाठी देण्यात आलेल्या तीन एकर जागेपैकी एकरभर जागेत धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाची उभारणी झाली आहे. उरलेल्या दोन एकरांत बसची देखभाल दुरुस्तीसाठीची कार्यशाळा, कार्यालय, नव्याने उभारलेला सीएनजी पंप आदी व्यवस्थांनी जागा व्यापली आहे. त्यातच आरटीओ कार्यालयाने जप्त केलेली वाहने ठेवून मोठी अडचण केली आहे. पाण्याचा टॅंकर, मालमोटारी, जीप, तीन व सहा आसनी रिक्षा या एक दोन म्हणता जप्त केलेल्या सुमारे सत्तर वाहनांचा अक्षरशः डोंगर रचला आहे. या जप्त केलेल्या वाहनांनी चार गुंठे जागा व्यापली आहे.

आगारात जागा शिल्लक नसल्यामुळे अनेक बस आगाराबाहेर उभा कराव्या लागत आहेत. यापूर्वीच्या सर्व आगार प्रमुखांनी वाहनांची अडगळ हटवण्यासाठी वरिष्ठांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. पीएमपीच्या सह व्यवस्थापकीय संचालकांनीही आरटीओला अनेकदा विनंती केली आहे. मात्र, आरटीओकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. बंद झालेला शिंदेवाडीच्या जकात नाक्‍याची जागा पीएमपीने निश्‍चित करून अखेर ती वाहने स्थलांतरित करण्याची तयारी सुरू केली आहे. वाहने उचलण्यासाठी आवश्‍यक असणारी क्रेन आणि ती वाहने वाहून नेणारे डंपर अशा यंत्रणेसाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात ती वाहने हटविण्याची अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न 
जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर वाहने झाकण्याची कोणतीच व्यवस्था नाही. या वाहनात पाणी साठून डास उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. आगारात कार्यरत असलेल्या सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com