सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

बहुतांश वाहनचालक 'झेब्रा क्रॉसिंग'च्या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेण्यात येत आहे. प्रत्येकाने वाहतुकीची समस्या हा माझा स्वतःचा प्रश्‍न आहे, असे मनाशी ठरविल्यास हा प्रश्‍न लवकर सुटेल. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक.

पुणे : शहरात रस्त्यांची लांबी तेवढीच; पण वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिग्नलला पोलिस उभे असतील, तरच आम्ही नियम पाळणार, या मानसिकतेमधून बाहेर येत वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर वाहतूक कोंडीसह बरेच प्रश्‍न मार्गी लागतील, असे मत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी व्यक्‍त केले. 

मोराळे यांनी वाहतुकीच्या संदर्भात 'सकाळ' कार्यालयात आयोजित बैठकीत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ''शहरातील रस्त्यांची लांबी तेवढीच आहे; पण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्‍य त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे. नागरिकांनी 'पिक अवर्स'मध्ये रस्त्यावर वाहने कमी आणावीत. शहरात कोंडी होणारे विशिष्ट चौक शोधून तेथे आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत.'' 

सीसीटीव्हीद्वारे कारवाई 
शहरात दररोज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सुमारे साडेतीन हजार वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तेवढीच कारवाई सीसीटीव्हीच्या माध्यमातून केली जात आहे. शहरात 440 ठिकाणी साडेबाराशे सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याद्वारे वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत दोन लाख 23 हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना सुमारे 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

वाहनचालकांमध्ये जनजागृती 
वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी शाळा- महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी काही प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले आहेत. महापालिका आणि वाहतूक विभागात योग्य समन्वय असल्याचे मोराळे यांनी सांगितले. 

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य 
पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना 15 सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. परंतु, पादचाऱ्यांनीही झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांवरूनच रस्ता ओलांडावा, जेणेकरून अपघात होणार नाहीत. शहरात चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेल्या गतिरोधक आणि रम्बलर्समुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्‍यांचा त्रास होत आहे, अपघातही होत आहेत. यावर त्यांनी हे गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेकडून इंडियन रोड कॉंग्रेसच्या निकषांनुसार केले जातात, त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित विभागाला कळविण्यात येईल, असे सांगितले. 

क्रेन, टेम्पोंची संख्या वाढविणार 
वाहनचालकांकडून नो-पार्किंगमध्ये वाहने लावली जातात. पी 1, पी 2च्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा वेग वाढविण्यासाठी क्रेन आणि टेंपोंची संख्या वाढविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेकडील उपलब्ध साधनांचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई 
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, बीआरटी मार्गांवर अन्य वाहने घुसू नयेत, यासाठी महापालिकेने वॉर्डन दिले आहेत. शिवाय, वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. 

हेल्मेट नसेल, तर तुमचेच डोके फुटेल 
मोराळे म्हणाले, ''दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट परिधान न केल्यास तुमचेच डोके फुटणार आहे, ही बाब संबंधित वाहनचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हेल्मेट घालायचे की नाही, ही जबाबदारी स्वत:चीही आहे.'' 

वाहतूक नियमनावर भर 
वाहतूक पोलिस केवळ दंडवसुली करण्यात व्यग्र असतात, अशी तक्रार केली जाते; परंतु वाहतूक नियमनास प्राधान्य देण्याबाबत पोलिसांना सक्‍त सूचना दिल्या आहेत. शहरात वाहनांची संख्या सुमारे 45 लाख असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. मात्र, दररोज केवळ सहा ते सात हजार जणांवर कारवाई केली जाते. 

Web Title: marathi news marathi website pune news pune traffic PMPML Pune Metro