'अक्षर फराळा'लाही ऑनलाइन ऑर्डर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पुणे : दिवाळी जवळ आली की नक्षीदार पणत्या, आकर्षक आकाश कंदील, चविष्ट फराळाकडे जितके लक्ष लागलेले असते तितकेच ते 'अक्षर फराळा'कडे वेधले जाते; पण यंदा 'जीएसटी' आणि वाढत्या महागाईमुळे दिवाळी अंकांच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 'अक्षर फराळा'ची चव महागल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. तरीही बाजारात आलेल्या अंकांबरोबरच ई-दिवाळी अंकांना वाचकांचा आतापासूनच प्रतिसाद मिळत आहे. 

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठ सजायला सुरवात झाली आहे. वेगवेगळ्या वस्तूंबरोबरच विविध विषयांना वाहिलेले दिवाळी अंकही बाजारात दिसू लागले आहेत. ते घेण्याबरोबरच 'हा अंक बाजारात आला का?' अशी विचारणाही वाचक उत्सुकतेने करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, काही पुस्तक विक्रेत्यांनी दिवाळी अंकांची ऑनलाइन ऑर्डर घेऊन वाचकांना घरपोच अंक द्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे दिवाळी अंकांच्या किमतीत वाढ झाल्याचा वाचकांच्या मागणीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. 

याबाबत दिवा संस्थेचे चंद्रकांत शेवाळे म्हणाले, ''महागाई, नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम दिवाळी अंकावर झाला आहे. त्यामुळे अंकांच्या किमती नेहमीपेक्षा जास्त पटीने वाढल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास बाराशे अंक प्रकाशित होतात; पण त्यातील जवळपास तीनशे अंकच चांगले असतात.'' 'अक्षरधारा'चे रमेश राठीवडेकर म्हणाले, ''आतापर्यंत शंभर दिवाळी अंक बाजारात आले आहेत. त्यापैकी 'हंस', 'मोहिनी', 'नवल' या अंकाच्या किमती शंभर रुपयांनी वाढल्या आहेत. अशीच वीस ते शंभर रुपयांची वाढ अनेक अंकांनी केली आहे; पण अंक घेण्याचा वाचकांचा कल सध्यातरी कायम आहे.'' 

अंकासाठी 'सोशल मीडिया'चा वापर 
दिवाळी अंकांना वाचकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा म्हणून अंकांची माहिती व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटर अशा 'सोशल मीडिया'च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवली जात आहे. मेहता पब्लिशिंग हाउस यांच्यासह इतर काही प्रकाशक संस्थांनी दिवाळी अंकांची दोन मिनिटांपर्यंतची आकर्षक 'क्‍लिप'च तयार केली आहे. तर काही अंकांनी 'फेसबुक'वरून यंदाच्या अंकात कोणत्या विषयांवर लेख आहेत, ते कोणत्या लेखकाने लिहिले आहेत, याची माहिती दिली आहे.

Web Title: marathi news marathi websites Diwali 2017 Marathi Diwali Ank