गगन सदन तेजोमय 

गगन सदन तेजोमय 

दिवाळीच्या दिवसांत रांगोळी, फटाके, फराळाबरोबरच रेलचेल असते ती "दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफलींची. गायन- वादन- नृत्यावर आधारित या मैफली दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. म्हणून तर भल्या पहाटे उठत, थंडीत प्रवास करत असंख्य पुणेकर ठिकठिकाणच्या "दिवाळी पहाट'ला आवर्जून हजेरी लावतात अन्‌ कलेतून आनंदाची अनुभूती घेतात. हे आनंददायी चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. 

अवघा रंग एक झाला 
शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो, नाही तर सदाबहार लावणी; तितक्‍याच सहजतेने गाणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या सुरांची मेजवानी श्रोत्यांना "दिवाळी पहाट'मध्ये अनुभवायला मिळाली. ही अनुभूती आली शिवसमर्थ प्रतिष्ठान आयोजित "दिवाळी पहाट'मध्ये. सिंहगड रस्ता भागातील आनंदनगर येथे ही मैफल झाली. "मी राधिका, मी प्रेमिका', "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग' अशी अजरामर गाणी सादर करून अंकलीकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. आमदार माधुरी मिसाळ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधव देशपांडे, सचिन भोसले, नगरसेविका मंजूषा नागपुरे, प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे उपस्थित होते. 

गप्पा-गाणी अन्‌ बरेच काही 
वात्रटिकाकार रामदास फुटाणे, रमण रणदिवे यांच्या कविता... नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे कथक नृत्य... राधा मंगेशकर, मनीषा लताड यांचे गायन... अशी काव्य- नृत्य- गायनावर आधारित आगळी-वेगळी "दिवाळी पहाट' श्रोत्यांना अनुभवायला मिळाली. "सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे आयोजित या कार्यक्रमाची सुरवात शनिवारवाड्याच्या पटांगणात पणत्या लावून करण्यात आली. त्यानंतर शर्वरी जमेनीस यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. कविता, गाणी, गप्पा, हास्यविनोद यावर आधारित कार्यक्रमात फुटाणे, रणदिवे यांच्यासह विश्वास जोशी, मकरंद टिल्लू यांनी रसिकांना खळखळून हसविले. राजकीय- सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कवितांनी श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. महोत्सवाची सांगता सुमधुर गायनाने झाली. "कानडा राजा पंढरीचा', "आली माझ्या घरी ही दिवाळी', "केव्हा तरी पहाटे', "मधुबन में राधिका' आदी गाण्यांमुळे मैफल रंगली. राधा मंगेशकर, प्रज्ञा देशपांडे, मनीषा लताड, राजेश दातार यांनी ही स्वरमैफल सजवली. 

हम एक हैं 
गायनाबरोबरच सर्वधर्मीयांनी एका व्यासपीठावर आणत स्वच्छंद आणि आरोही या संस्थांनी "हम एक हैं' हा संदेश "दिवाळी पहाट'मधून दिला. यात बिशप थॉमस डाबरे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ. ए. पी. कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग आदी सहभागी झाले होते. डाबरे म्हणाले, ""दिवाळी हा मनामनांत आनंद निर्माण करणारा सण आहे. केवळ हिंदू धर्मीयांमध्येच नव्हे, तर सर्व धर्मीयांमध्ये चैतन्य निर्माण करणारा हा सण आहे.'' सणांच्या माध्यमातून आपण एकता कायम ठेवली, ती अधिक घट्ट केली पाहिजे, असे तांबोळी यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता आरती आठल्ये, जयंत सबनीस, रवींद्र शाळू यांच्या बहारदार मराठी गाण्यांनी झाली. 

"अभंगवाणी'त रंगले श्रोते 
विविध रागांवर आधारित नाट्यगीते, अभंगवाणी, गीत-गझल यांची मेजवानी श्रोत्यांना पाडव्याच्या पहाटे मिळाली. चित्तरंजन वाटिकेत "नवनिर्माण अभियान'च्या वतीने दीपावली संगीत महोत्सव आयोजिण्यात आला होते. यात गायिका डॉ. कल्याणी बोंद्रे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली. बोंद्रे यांनी गायनाची सुरवात राग "जौनपुरी'ने केली. त्यात विलंबित बंदिश "बाजे झनन पायलिया', "छुम छननन बिछुवा बाजे' ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर करून त्यात लयकारी, सरगम व बोलतानेचा वापर करून त्यांनी श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर राग "अल्हैया बिलावल'मधील "कवन बटरिया' बंदिश सादर करून मैफल रंगवली. अमित जोशी (तबला), अभिजित पाटसकर (संवादिनी), वसंत देव (तालवाद्य) आणि रीमा पाटसकर (तानपुरा) यांनी साथ केली. नवनिर्माण अभियानाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक राजू पवार उपस्थित होते. अरविंद बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. 

"दिवाळी पहाट'मधून प्रबोधन 
वाचाल तर वाचाल, शिक्षणातूनच खरी प्रगती, मुलगा-मुलगी समान; व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांपासून दूर राहा, हुंड्याची प्रथा गाडून टाका... अशा विविध विषयांवर "विद्रोही जागर' या "दिवाळी पहाट'मध्ये शाहीर राजेंद्र कांबळे यांनी रसिकांचे प्रबोधन केले. शेतकऱ्यांच्या व्यथा, स्त्रियांवरील अन्याय आदी विषयांना स्पर्श करत त्यांनी रसिकांना विचार करायला भाग पाडले. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित "बळिराजा महोत्सव : प्रबोधन दिवाळी पहाट' या कार्यक्रमात शाहिरीने रसिकांना खिळवून ठेवले. बालगंधर्व रंगमंदिर रसिकांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. शेतकरी कामगार पक्षाचे प्रवीण गायकवाड, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राजाभाऊ चोपदार, अंकुश आसबे, नरेश शेट्टी, वैभव शेळके व "शिवस्फूर्ती'च्या अध्यक्ष शैलजा मोळक उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com