बालकुमार साहित्य संमेलन पुन्हा होणार 

Anil Avchat
Anil Avchat

पुणे : बालकुमार साहित्य संस्थेतील अंतर्गत वादामुळे गेली तीन वर्षे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच बालकुमार साहित्य संमेलन भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परिषदेचे पहिले संमेलन लोणावळा येथे होणार असून, याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची सन्मानाने निवड करण्यात आली आहे. 

लोणावळ्यातील मनःशक्ती प्रयोग केंद्राच्या सहकार्याने हे एकदिवसीय साहित्य संमेलन 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार असून, त्यात शाळांमधील सातशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या वेळी 'मराठी अभिमान गीत' शालेय विद्यार्थी सादर करतील. त्यानंतर उद्‌घाटन सत्रात डॉ. अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत. 

विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बालकवितांवर आधारित विशेष कार्यक्रम लेखक राजीव तांबे सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्‍लेषा महाजन आणि आदित्य दवणे 'लेखनाची आनंद वाट' या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेणार आहेत. 'आम्हालाही काही सांगायचंय' या विशेष कार्यक्रमात अनेक बालकुमार स्वत:च्या कथा, कविता आणि लेखांचे सादरीकरण करणार आहेत. समारोप सोहळ्यात जिल्हाधिकारी सौरभ राव मुलांशी संवाद साधतील. या वेळी 'मनःशक्ती'चे विश्वस्त प्रमोद शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, विश्वस्त गजानन केळकर, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. 

उद्याच्या साहित्य-संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांसाठीची साहित्य संमेलने बंद पडली आहेत. ही मुले साहित्य आणि संमेलनाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हावार आणि साधेपणाने बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. 
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com