चाकणला सर्वपक्षीय "रास्ता रोको' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

चाकण : राज्यात बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात; तसेच "पेटा' संघटनेचा निषेध करण्यासाठी व संघटनेवर बंदी घालावी, या मागणीसाठी बैलगाडा मालक, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने येथील तळेगाव चौकात आज सुमारे अडीच तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील लोकांना हटवून वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनावेळी महामार्ग बेकायदा रोखून धरल्याप्रकरणी खासदार, आमदार यांसह इतर कार्यकर्ते अशा चाळीस जणांवर; तसेच बैलगाडा मालक व इतर अशा साडेतीन हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन बैलगाडा मालकांना खासदार, आमदार यांनी केले; पण कोणीही ऐकत नव्हते. उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले. मात्र, नेत्यांचे कार्यकर्ते ऐकत नव्हते. पोलिसांनी खासदार, आमदार यांना ताब्यात घेतल्यानंतर विशेष पोलिस बल; तसेच स्थानिक पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठविले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. वाहतूक थांबल्यामुळे प्रवाशांचे, नागरिकांचे मात्र हाल झाले. वाहनांच्या रांगा अगदी चार- पाच किलोमीटरपर्यंत पोचल्या होत्या. रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. रस्त्याच्या कडेला बैलगाड्यांचे पाचशेच्यावर बैल बांधण्यात आले होते. 

पोलिस अधिकारी आंदोलन मागे घ्या, अशी विनवणी खासदार, आमदारांना करत होते. त्या वेळी नेते हात जोडून, "ऐका, मला बोलू द्या, एक मिनिटे बोलू द्या,' अशी विनवणी करत होते; पण बैलगाडा मालक, कार्यकर्ते ऐकून घेत नव्हते. त्यामुळे आंदोलन चिघळणार, असे चित्र होते; पण पोलिस अधिकारी व नेत्यांनी संयमाने आंदोलन शांत केले. या आंदोलनातून बैलगाडा मालक व कार्यकर्ते नेत्यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवत नाही, असे चित्र दिसून आले. 

या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले, ""बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मी न्यायालयात प्रयत्न केले आहेत. लोकसभेत प्रश्‍न उपस्थित केले आहेत; परंतु "पेटा'ने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आहे. "पेटा' संघटनेला व त्यातील लोकांना बैलगाडा मालक बैलांना किती जीव लावतो, हे माहीत नाही. संघटनेला निधी किती मिळतो, याची चौकशी झाली पाहिजे. बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे लोकसभेत विधेयक आणून बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत. राज्य सरकार नेमके काय करते, हा प्रश्‍न आहे. बैलगाडा मालकांच्या सहनशक्तीचा अंत सरकारने पाहू नये. सरकारने बैलगाडा शर्यती चालू केल्या नाही, तरी बैलगाडा मालक बैलगाडे पळवतील.'' 

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, सुरेश गोरे, महेश लांडगे व शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप मोहिते व दिगंबर भेगडे, आशा बुचके, रामकृष्ण टाकळकर यांनी व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी आमदार लांडगे यांनी "पेटा' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर खालच्या भाषेत टीका केली. 

प्रवाशांचे हाल 
या आंदोलनामुळे महामार्ग गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच अडीच तास रोखला गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी झाली होती. या वाहतूक कोंडीत एसटी बसमधील प्रवाशांचे व लहान मुलांचे हाल झाले; तसेच मोटारींमधील लोकांचेही हाल झाले. त्यामुळे या आंदोलनाबद्दल प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला. 

Web Title: marathi news marathi websites Pune News bailgada sharyat bullock cart race