बँकांसाठी पैसा आला कोठून? : अजित पवार यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

भवानीनगर : ''नोटाबंदीच्या निर्णयाने उद्योग मोडकळीस आणले आणि फसव्या कर्जमाफीने शेतकरी उद्‌ध्वस्त केले. राज्य सरकार फक्त कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटतेय, मात्र सारे काही बँकांवर ढकलून दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नाही आणि बँकांचा पैसा बुडविलेल्या उद्योगांपायी बँकांना मात्र 2 लाख कोटींची मदत करायला या सरकारकडे पैसा कोठून येतो,'' असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 

भवानीनगर : ''नोटाबंदीच्या निर्णयाने उद्योग मोडकळीस आणले आणि फसव्या कर्जमाफीने शेतकरी उद्‌ध्वस्त केले. राज्य सरकार फक्त कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटतेय, मात्र सारे काही बँकांवर ढकलून दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नाही आणि बँकांचा पैसा बुडविलेल्या उद्योगांपायी बँकांना मात्र 2 लाख कोटींची मदत करायला या सरकारकडे पैसा कोठून येतो,'' असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 

कळस (ता. इंदापूर) येथे अर्जुन देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या नेचर डिलाइट डेअरी अँड डेअरी प्रॉडक्‍ट्‌स या दैनंदिन पाच लाख लिटर क्षमतेच्या दूध प्रकल्पाचे उद्‌घाटन पवार यांनी आज केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, खानापूरचे आमदार अनिल बाबर, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, तासगावच्या आमदार सुमन पाटील, राजापूरचे आमदार राजन साळवी, माणचे आमदार जयकुमार गोरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे, उत्तम फडतरे, वैशाली पाटील, अर्जुन देसाई, गोकुळा देसाई, कांतिलाल जामदार व दूध प्रकल्पाचे सर्व संचालक उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ''खरेतर शेतीशी संबंधित व्यवसायाला 'जीएसटी' लावायला नको होता. नोटाबंदीने उद्योग मोडकळीस आणले. उद्योग मोडायला काही अक्कल लागत नाही, उभारायला खूप कष्ट घ्यावे लागतात. आम्ही सत्तेत असताना 'जीएसटी' आणायची ठरवले, मात्र सर्वसामान्यांना झेपेल, असा त्याचा दर लावायचा होता. भाजप सरकारच्या 28 टक्‍क्‍यांपर्यंतच्या 'जीएसटी'ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले.'' 

''उद्योग बंद पडू लागले आहेत. नोकऱ्या जाऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपून नोकऱ्या निर्माण करणारे अर्जुन देसाई यांच्यासारखे उद्योजक ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांनी विविध राजकीय पक्षांत संबंध जपले. ते केवळ व्यावसायिक नव्हे, तर सामाजिक स्तरावरही जपले. त्यामुळेच राज्यभरातले आमदार त्यांच्यासाठी येथे येतात. त्यांनी कोठेही मीपणा आड येऊ न देता समाजात मित्रत्वाचे नाते व आदराचे स्थान निर्माण केले. उद्योगातही ते सचोटी ठेवून काम करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे.'' 

डॉ. पूनम देसाई यांनी प्रास्ताविकात केंद्र सरकारने नावीन्यपूर्ण योजनेत भारतातून निवडलेल्या 101 प्रकल्पांमध्ये नेचर डिलाइटचीही निवड केली असून, अत्यल्प कालावधीत तयार झालेला हा प्रकल्प केंद्र सरकारलाही आवडल्याचे नमूद केले. ज्ञानेश्‍वर जगताप, अनिल रूपनवर, स्वाती कडू यांनी सूत्रसंचालन केले. 

आणीबाणीचा प्रयत्न 
''मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा नावाने योजना काढल्या, मात्र प्रत्यक्षात बेरोजगारी अधिक वाढली. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. येत्या 9 तारखेला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होईल. नोटाबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले. सगळ्यात मोठा फटका तर गरिबांनाच बसला. या सरकारने जगात आपल्याबद्दल हसू करून घेतले आहे. मात्र, हे सरकार स्वतःत मश्‍गूल आहे. पंतप्रधानांच्या विरोधात नक्कल केली, तर गुन्हा दाखल करणारे हे सरकार मागच्या दाराने आणीबाणी आणू पाहत आहे,'' असा आरोप अजित पवार यांनी केला. 

''परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचे कोणालाच काही देणेघेणे नाही. कीटकनाशकांच्या तपासण्या नाहीत. त्यामुळे कीटकनाशके मारतानाच शेतकरी मरू लागले आहेत. कीटक मारायची यांनी औषधे काढलीत का माणसे मारण्यासाठी, हेच कळेनासे झाले आहे.'' 
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Web Title: marathi news marathi websites Pune News Baramati News Ajit Pawar Farmers Loan waiver