नोकऱ्या मिळण्यासाठी पूरक शिक्षणाची गरज : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : शिक्षण पद्धतीत आवश्‍यकतेनुसार लवचिकता आणण्यासोबतच उपलब्ध नोकऱ्या मिळण्यासाठी पूरक शिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. 

पुणे : शिक्षण पद्धतीत आवश्‍यकतेनुसार लवचिकता आणण्यासोबतच उपलब्ध नोकऱ्या मिळण्यासाठी पूरक शिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. 

सिंबायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीतर्फे (एसएसओयू) आयोजित कार्यक्रमात 'सिंबायोसिस स्कील सेंटर ऑफ एक्‍सलन्स'चे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, प्रभारी कुलगुरू डॉ. श्रवण कडवेकर आदी या वेळी उपस्थित होते. स्कील सेंटर ऑफ एक्‍सलन्समध्ये मॅकोट्रॉनिक्‍स आणि ऑटोमोबाईल ट्रेडच्या लॅब उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. एसकेएफ कंपनीच्या सहकार्याने एक प्रयोगशाळा उभारली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 'हॅन्डस ऑन ट्रेनिंग'चा अनुभव घेता येईल. तर 'रिटेल मॅनेजमेंट' क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळण्यासाठी 'शॉपर्स स्टॉप' आणि 'बिग बझार'सोबत करार केले आहेत. 

फडणवीस म्हणाले, ''आपल्या देशातील पन्नास टक्के लोकसंख्या ही पस्तीस वर्षांच्या आतील तर 65 टक्के लोकसंख्या तीस वर्षांच्या आत आहे. अशी परिस्थिती दोनशे ते तीनशे वर्षांतून एकदा उद्‌भवते. युरोपात ही परिस्थिती आल्यानंतर तेथील प्रशासनाने या मनुष्यबळाचा वापर करून घेऊन विकासामध्ये क्रांती केली. आता ही परिस्थिती आपल्या देशात आहे. या मनुष्यबळाला रोजगाराभिमुख शिक्षण देण्याबरोबरच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाला रोजगाराची संधी उपलब्ध करू न दिल्यास हे मनुष्यबळ आपल्यासाठी धोकादायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात मागे पडलेली देशातील पारंपरिक शिक्षण पद्धती बदलण्यासाठी विचारवंत, उत्तम शिक्षक, संशोधक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.'' 

विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी औद्यागिक कंपन्या आणि शिक्षण संस्थांमध्ये करार होऊन देवाणघेवाण होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये काम केल्यास त्यांना शैक्षणिक 'क्रेडिट्‌स' दिले पाहिजे. देशात कौशल्य विकासाला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यामुळे युवा वर्गाला नोकरीची संधी मिळेल. एसएसओयू विद्यापीठाच्या अनुभवावर देशात खासगी-सरकारी विद्यापीठांची निर्मिती होईल. ही विद्यापीठे देशाच्या आणि जगाच्या आर्थिक व्यवस्थेला कुशल मनुष्यबळ पुरविणाऱ्या जागा बनणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

डॉ. मुजुमदार म्हणाले, ''देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यांना शिकण्यासाठी अनेक कॉलेज आणि विद्यापीठे लागणार असल्याने त्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.'' 

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, ''विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठांमध्ये पीएचडी झालेल्या प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागते. मात्र, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कौशल्य विकासाशी निगडित अभ्यासक्रमांमध्ये पीएचडी केलेले प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राध्यापक कसे येतील, असा प्रश्न आहे. त्यामुळे ही अट शिथिल केली पाहिजे.''

Web Title: marathi news marathi websites Pune News Devendra Fadnavis Pune Education