कळंब-अंथुर्णेच्या पाणीपुरवठ्यासाठी साडेअकरा कोटींचा निधी मंजूर

राजकुमार थोरात
बुधवार, 27 डिसेंबर 2017

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील कळंब व अंथुर्णे गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून साडेअकरा कोटींचा निधी व आठ गावांना पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यासाठी जलस्वराज्य योजनेतंर्गत १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील कळंब व अंथुर्णे गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून साडेअकरा कोटींचा निधी व आठ गावांना पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यासाठी जलस्वराज्य योजनेतंर्गत १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

सन २०१७-१८ साठी कळंब गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अंथुर्णे गावासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दोन्ही गावांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. कळंब गावातील पाणी क्षारयुक्त असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट तसेच वालचंदनगर परिसरातून पाणी दुचाकी, चारचाकीमधून पाणी आणावे लागत होते.

अंथुर्णे गावातील नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. दोन्ही गावच्या पाणीपुरवठा योजनेची कामे लवकरच सुरु होणार असून पाण्याची टाकी, पाईपलाईन वितरण व्यवस्था, साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील आठ गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जलस्वराज्य टप्पा क्रमाक - २ या योजनेतून आठ गावांना पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यासाठी १ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रणगाव (१७ लाख ३१ हजार), शेळगाव (१७ लाख ३९ हजार), निमसाखर (१७ लाख ४१ हजार), पिठेवाडी येथील जाधववाडी (१० लाख ७८ हजार), वरकुटे बु.येथील बनकरवाडी (९ लाख २५ हजार), निरवांगी (१४ लाख १९ हजार), घोरपडवाडी (१४ लाख १९ हजार) व बोराटवाडी (१४ लाख १९ हजार) या गावांचा समावेश अाहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यासाठी शहा- महादेवनगर,कचरवाडी-निमगाव केतकी, रनिमगांव, पोंदकुलवाडी, काझड, जाचकवस्ती, पिठेवाडी या सात गावांना पाणी निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

अशुद्ध व क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गावात जल शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी प्रयत्न करणार सुरु असून यापूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली असून तेथील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळत असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Pune News Indapur Water Supply