दूध उत्पादक पुन्हा अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

निरगुडसर : राज्य सरकारने दुधाचा हमीभाव 27 रुपये प्रतिलिटर करूनदेखील सहकारी व खासगी दूध संघांनी दुधाचे दर पुन्हा 21 ते 22 रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. दुधाचा प्रतिलिटर उत्पादन खर्च 30 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दूध उत्पादक पुन्हा कात्रीत सापडला आहे. 

निरगुडसर : राज्य सरकारने दुधाचा हमीभाव 27 रुपये प्रतिलिटर करूनदेखील सहकारी व खासगी दूध संघांनी दुधाचे दर पुन्हा 21 ते 22 रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. दुधाचा प्रतिलिटर उत्पादन खर्च 30 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दूध उत्पादक पुन्हा कात्रीत सापडला आहे. 

1 जून 2017 रोजी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप केल्यानंतर दुधाची विक्री न करता दूध रस्त्यावर ओतून निषेध केला. कुठल्याही प्रकारे दुधासह भाजीपाला शहरात जाऊ दिला नाही. त्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घेत दुधाला 24 रुपयांवरून 27 रुपये हमीभाव केला. तसेच जो हा दर देणार नाही त्यांच्यावर कारवाईचा इशाराही सरकारने दिला होता. त्यामुळे 3.5 फॅट व 8.5 स्निघ्नता यास 27 रुपये भाव तसेच 3.5 फॅटच्या पुढे प्रतिपॉइंटला 30 पैसे असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर दुधाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले होते; परंतु काही महिन्यांतच पुन्हा दुधाचे दर 'जैसे थे' होण्यास सुरवात झाली आहे. सरकारच्या हमीभावाच्या निर्णयाला न जुमानता खासगीसह सहकारी दूध संघांनी दुधाचे दर 27 रुपयांहून खाली थेट 21 ते 22 रुपयांवर आणले. त्यामुळे जे दूध संघ 27 रुपये प्रतिलिटर दुधाला भाव देणार नाही, अशा संघावर सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे अशांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे. 

दुधाच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता दुधाला किमान 35 रुपये प्रतिलिटर दर असणे आवश्‍यक आहे. हिरवा चारा, भुस्सा, पेंड, कांडीचे दर वाढल्याने प्रतिलिटर दुधाचा उत्पादन खर्च 30 रुपयांच्या पुढे गेल्याने आता शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नाही. ज्या वेळी दुधाला 27 रुपयांहून अधिक दर मिळत होता त्या वेळी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून नवीन गाईंची खरेदी केली. कर्ज काढून दुग्ध व्यवसाय वाढवला; परंतु दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 
थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील शिवशंकर दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे म्हणाले, ''दीड महिन्यापूर्वी दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. तो दर आता 22 रुपयांवर येऊन पोचला आहे. मिळत असलेला दर उत्पादन खर्चाच्या मानाने खूप कमी आहे.'' 

चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील दूध उत्पादक शेतकरी संदीप वाबळे म्हणाले, ''सध्या दुधाला 21 ते 22 रुपये दर मिळत असून, या दरातून शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चसुद्धा भागत नाही. जनावरांच्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती पाहता दुधाला प्रतिलिटर 30 रुपयांहून अधिक दर मिळाला पाहिजे.'' 

दुग्धजन्य पदार्थांना कमी मागणी : हिंगे 
पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे म्हणाले, ''सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे भाव उतरले आहेत. तसेच दुग्धजन्य पदार्थांना बाजारात मागणी कमी असल्याने दुधाचे दर घसरले आहेत. दूध संघाकडून 3.5 फॅटला प्रतिलिटर 22.70 रुपये दर दिला जात आहे.''

Web Title: marathi news marathi websites Pune News Milk Products