राज्यातील भाजपचे सरकार ही तात्पुरती व्यवस्था : संजय राऊत

File photo
File photo

नारायणगाव : ''राज्यातील भाजपचे सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे.विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला आहे. शिवसेनेला संपविण्याचे भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राज्यात काँग्रेस नेत्यांचे राजकारण संपले आहे. भारतीय जनता पक्षाचे राजकारण इतर पक्षातून आलेल्या भाडोत्री नेत्यांवर सुरू आहे,'' अशी प्रखर टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथील शिवसेना मेळाव्यात केली.

जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने येथील जयहिंद मंगल कार्यालयात खासदार राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी,कष्टकरी विरोधी धोरणावर जोरदार प्रहार केला. या वेळी 'मी म्हणजेच शिवसेना पक्ष' अशी टिमकी मिरवणाऱ्यांना राऊत यांनी खडेबोल सुनावले.

मेळाव्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक बाजीराव दांगट, आमदार सुरेश गोरे,जिल्हा अध्यक्ष राम गावडे, गटनेत्या अशा बुचके, तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, सहसंपर्क प्रमुख अविनाश राहणे, अरुण गिरे, उपसभापती दिलीप डुंबरे, सभापती ललिता चव्हाण, विजया शिंदे, जयश्री पलांडे, सुलभा उबाळे आदि उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, ''बाळासाहेबांचे विचार,नेतृत्व घेऊन पन्नास वर्ष टिकलेला शिवसेना पक्ष आहे. सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याची जिगर शिवसेनेत आहे गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही. बाळासाहेबांना दगा दिलेले तुरुंगात असून राजकारण संपल्याने काही वनवासात आहेत. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधणीचे काम सुरू केले आहे. शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे,'' पुढील निवडणूक स्वबळावर लढवून शिवसेनेचे 145 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्‍वास या वेळी राऊत यांनी व्यक्त केला.

राऊत पुढे म्हणाले, ''मी म्हणजे पक्ष, मी सांगेल ती पूर्व दिशा अशी 'मी' पणाची भूमिका शिवसेनेत खपवून घेतली जाणार नाही. शिवसैनिकांना कठोर शिस्त लावण्याची वेळ आली आहे.पु ढील जुन्नर तालुक्‍याचा आमदार हा शिवसेनेचाच असणार आहे. या साठी पडेल ती किंमत मोजण्यास मी तयार आहे.

खासदार आढळराव पाटील म्हणाले, ''मी शिवसेनेशी कधीही प्रतारणा करणार नाही. माझ्या बाबत वावड्या उठवल्या जातात. शिवसेनेत काही बांडगुळे आहेत. काही वेळेला पक्ष संघटनेकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. शिवसेना संघटनेत गद्दारी वाढली आहे. राऊत यांनी गद्दारांची हकालपट्टी केल्यास शिरूर मतदार संघात चार आमदार निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.''

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना आढळराव पाटील म्हणाले, ''अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केला. तीन वर्षात 25 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या,पाच हजार कंपन्या बंद पडल्या.'' या मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com